पाकिस्तानने मिळवला युएईवर विजय, दिमाखात केला सुपर ४ मध्ये प्रवेश (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बुधवारी दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या आशिया कप सामन्यात पाकिस्तानविरुद्ध विजयासाठी १४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्थानिक संघाला शराफूच्या रूपात पहिला धक्का बसला. शराफूला शाहीनने १२ धावांवर बाद केले. तर पाकिस्तानने युएईला सुरूवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व मिळवता आले नाही.
पाकिस्तानने २० षटकांत ९ गडी गमावून १४६ धावा केल्या होत्या. युएईला विजयासाठी १४७ धावांची आवश्यकता होती. फखर जमानच्या अर्धशतकामुळे आणि शाहीनच्या १४ चेंडूत २८ धावांच्या शेवटच्या डावामुळे पाकिस्तानने ही धावसंख्या गाठली. तथापि, कमकुवत युएईविरुद्ध पाकिस्तानी फलंदाजी डगमगली. या सामन्यात पाकिस्तानचे सहा फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. युएईकडून जुनैद सिद्दीकीने ४ षटकांत १८ धावांत ४ बळी घेतले, तर सिमरनजीतने ४ षटकांत २६ धावांत ३ बळी घेतले. युएईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. युएईने या सामन्यात एका बदलासह प्रवेश केला, तर पाकिस्तानने दोन बदल केले.
UAE ची खेळी
युएईची सुरूवातदेखील धडपडतच झाली. पाकिस्तानच्या फिरकीसमोर त्यांनी बराच चांगला प्रयत्न केला असे म्हणावे लागेल. मात्र १५ ओव्हर्समध्ये युएईने ५ विकेट्स काही अंतराने गमावल्या होत्या आणि जास्त रन्स मिळवू शकले नाहीत. ८८ धावा देत ५ विकेट्स काढण्यास पाकिस्तानच्या संघाला यश मिळाले आणि इथेच मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला. यानंतर चोप्राने सिक्स मारत पुन्हा आशा जागृत केल्या होत्या. मात्र ९६ धावांवर चोप्रा आऊट झाला आणि युएईची ९६ वर ६ आऊट अशी अवस्था झाली. युएईचा संघ संपूर्ण २० ओव्हर्सदेखील खेळू शकला नाही आणि १७.४ षटकांमध्ये संघ गारद झाला. आजचा सामना महत्त्वाचा आहे कारण जो संघ जिंकणार तोच सुपर ४ मध्ये जाणार होता आणि ही जागा पाकिस्तानने बळकावली आहे.
Asia cup 2025 : UAE चा TOSS जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय! पाकिस्तान इज्जत वाचवण्यासाठी खेळणार
पाकिस्तानचा ड्रामा
तत्पूर्वी, सामना सुमारे एक तास उशिराने सुरू झाला. पाकिस्तानी संघाला हॉटेल सोडू नये असे शेवटच्या क्षणी आदेश मिळाले. त्यानंतर, पाकिस्तानी संघ आजचा सामना खेळेल की नाही हे स्पष्ट झाले नाही. संपूर्ण वेळापत्रक समजून घ्या
१४ सप्टेंबर: हस्तांदोलनाच्या घटनेनंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा यांनी सामन्याच्या सादरीकरणाला उपस्थित राहण्यास नकार दिला. भारताने हस्तांदोलन करण्यास नकार दिल्याबद्दल प्रशिक्षक माइक हेसन यांनी नाराजी व्यक्त केली.
१५ सप्टेंबर: पाकिस्तान संघाचे व्यवस्थापक नवीद चीमा यांनी सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याविरुद्ध भारताची बाजू घेतल्याबद्दल आयसीसीकडे तक्रार दाखल केली आणि पीसीबीने त्यांना आशिया कप सामन्यांमधून तात्काळ काढून टाकण्याची मागणी केली.
१६ सप्टेंबर: सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्टची बदली करण्याची पीसीबीची मागणी आयसीसीने फेटाळून लावली आणि जर पायक्रॉफ्ट युएईविरुद्धच्या सामन्यासाठी सामनाधिकारी राहिले तर मैदानात उतरणार नाही अशी धमकी पीसीबीने दिली. पाकिस्तानने त्यांची नियोजित सामन्यापूर्वीची मीडिया कॉन्फरन्स रद्द केली. तथापि, त्यांनी आयसीसी अकादमी मैदानावर पूर्वी नियोजित सराव सत्र खेळले. सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना काढून टाकण्याच्या मागणीचा पुनरुच्चार करत पीसीबीने आयसीसीला दुसरे पत्र लिहिले.
१७ सप्टेंबर: काही माध्यमांच्या वृत्तानुसार अँडी पायक्रॉफ्ट यांना युएईविरुद्धच्या सामन्यातून वगळण्यात आले आहे. तथापि, पाकिस्तानी संघ अँडी पायक्रॉफ्टला कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण स्पर्धेतून काढून टाकू इच्छित होता.
सामना सुरू होण्याच्या सुमारे तीन तास आधी, घटना वेगाने बदलल्या. दुबईमध्ये आयसीसीची आपत्कालीन बैठक झाली. त्यानंतर, हॉटेल सोडण्यासाठी आधीच संघाच्या बसमध्ये सामान भरलेल्या पाकिस्तानी संघाला अचानक थांबण्यास सांगण्यात आले. त्यानंतर पाकिस्तानी माध्यमांनी दावा केला की पाकिस्तान आशिया कपमधून बाहेर पडेल आणि लवकरच घरी परतेल. पाकिस्तानी बोर्डाची बैठक झाली. या बैठकीनंतर सामना खेळण्याचा निर्णय घेण्यात आला. संघ हॉटेलमधून स्टेडियमकडे रवाना झाला आणि एक तास उशीरा सामना सुरु झाला.
कोण आहेत Andy Pycroft? ज्यांना हटवण्यासाठी पाकिस्तानने केली मागणी
प्लेइंग इलेव्हन
यूएई प्लेइंग इलेव्हन: अलिशान शराफू, मोहम्मद वसीम (कर्णधार), आसिफ खान, मोहम्मद जोहैब, हर्षित कौशिक, राहुल चोप्रा (यष्टिरक्षक), ध्रुव पराशर, हैदर अली, मोहम्मद रोहिद खान, सिमरनजीत सिंग, जुनैद सिद्दीकी.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन: सैम अयुब, साहिबजादा फरहान, मोहम्मद हरिस (यष्टिरक्षक), फखर जमान, सलमान आघा (कर्णधार), खुशदिल शाह, हसन नवाज, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद.