कोण आहेत Andy Pycroft? (Photo Credit- X)
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून सांगितले की, पाकिस्तानने अँडी पायक्रॉफ्ट यांच्या विरोधात आयसीसीकडे तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर त्यांना या स्पर्धेतून काढून टाकण्याचीही मागणी केली आहे. आयसीसीमध्ये दाखल केलेल्या तक्रारीत पाकिस्तानचे म्हणणे आहे की, पायक्रॉफ्ट यांनी पक्षपाती भूमिका घेतली. मॅच रेफ्री या नात्याने ते दोन्ही कर्णधारांना हस्तांदोलन न करण्याचे निर्देश देऊ शकत नाहीत, असा युक्तिवाद पाकिस्तानने केला आहे.
Remember the name – “Andy Pycroft” from Zimbabwe 🇿🇼 pic.twitter.com/7IRyNGajbp — Richard Kettleborough (@RichKettle07) September 17, 2025
मिळालेल्या माहितीनुसार, जर अँडी पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची मागणी मान्य झाली नाही, तर पुढील सामना यूएईविरुद्ध खेळणार नाही, अशी धमकीही पाकिस्तानने दिली होती. पण, आयसीसीने पाकिस्तानची ही मागणी फेटाळून लावली.
झिम्बाब्वेचे माजी क्रिकेटपटू असलेले अँडी पायक्रॉफ्ट हे जगातील सर्वात अनुभवी मॅच रेफ्रींपैकी एक आहेत. २००९ पासून ते आयसीसीच्या एलिट पॅनेलचा भाग आहेत. आतापर्यंत त्यांनी १०३ कसोटी सामन्यांसह २४८ वनडे आणि १८३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये रेफ्री म्हणून भूमिका बजावली आहे. याव्यतिरिक्त, त्यांनी २१ महिला टी-२० सामन्यांमध्येही मॅच रेफ्री म्हणून काम केले आहे.
६९ वर्षीय अँडी पायक्रॉफ्ट हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटही खेळले आहेत. त्यांनी झिम्बाब्वेकडून ३ कसोटी आणि २० वनडे सामने खेळले आहेत. त्यांच्या नावावर एकूण ४४७ धावांची नोंद आहे. १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेत कपिल देव यांनी १७५ धावांची ऐतिहासिक खेळी केली होती, तेव्हा अँडी पायक्रॉफ्ट हे झिम्बाब्वे संघाचा भाग होते.






