क्रिकेटप्रेमी हादरले! उष्णतेच्या झळा जिवावर बेतल्या, पाकिस्तानी क्रिकेटरचा मैदानातच करूण अंत(फोटो-सोशल मीडिया)
Pakistani Cricketer Dies : आतापर्यंत तुम्ही क्रिकेटच्या मैदानात धावताना किंवा दम लागल्याने अथवा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या बातम्या वाचल्या किंवा ऐकल्या असतील. अशा घटनांचे अनेक व्हिडीओही यापूर्वी व्हायरल झाले आहेत. मात्र नुकत्याच घडलेल्या एका विचित्र घटनेमध्ये क्रिकेटच्या मैदानावर चक्क उष्णता सहन न झाल्याने एका क्रिकेटपटूने मैदानातच शेवटचा श्वास घेतला. मरण पावलेला क्रिकेटपटू पाकिस्तानी वंशाचा आहे. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जुनैद जाफर खान असं मृत तरुणाचं नाव आहे. तो क्रिकेटच्या मैदानामध्ये खेळपट्टीवरच चक्कर येऊन पडला. शनिवारी तापमान 41.7 अंश सेल्सिअस असताना खेळवल्या जात असलेल्या क्रिकेट सामन्यादरम्यान हा सारा प्रकार घडला. ऑस्ट्रेलियातील ‘द ओल्ड कॉनकोर्डियन्स क्रिकेट क्लब’कडून जुनैद खेळायचा. शनिवारच्या या सामन्यात जुनैदने आधी 40 ओव्हर मैदानात फिल्डींग केली होती. त्यानंतर त्याने प्रिन्स अल्पेड ओल्ड कॉलेजियन्सच्या संघाविरुद्ध नाबाद 16 धावा केल्या.
हेही वाचा : Viral Video :ब्रॅड हॉगने मुलाखतीत मोहम्मद रिझवानची अशी टेर खेचली..; तुम्हालाही येईल जोरात हसायला!
हा सामना अॅडलेडमधील कॉनकोर्डियन्स कॉलेजच्या मैदानावर खेळवण्यात आला होता. सामना संपल्यानंतर जुनैद मैदानावरच कोसळला. स्थानिक वेळेनुसार तो दुपारी चारच्या सुमारास मैदानात कोसळल्यानंतर मैदानावरच रुग्णावाहिका बोलावण्यात आली. मात्र त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याने मैदानात प्राण सोडले होते. ‘न्यूज डॉट कॉम डॉट एयू’ने दिलेल्या वृत्तानुसार, जुनैद हा पाकिस्तानमधून 2013 साली ऑस्ट्रेलियात स्थायिक झाला होता. तो माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करायचा.
‘डेली मेल’ने दिलेल्या माहितीनुसार, जुनैद हा रमजाननिमित्त रोजे पाळत असल्याने त्याने सामन्याच्या दिवशी सुर्योदयानंतर काही खाल्लेले नव्हते. मात्र, तो दिवसभर वेळोवेळी पाणी पित होता, असं जुनैदच्या मित्राने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. बरं वाटत नसेल तर रमजानच्या काळात सकाळीही पाणी पिण्याची मुभा मुस्लिमांना असते.
‘द ओल्ड कॉलेजियन’ने जारी केलेल्या पत्रकामध्ये जुनैदच्या निधनाबद्दल खेद व्यक्त करण्यात आला आहे. “आमच्या संघातील सहकाऱ्याच्या मृत्यूने आम्हाला फार वाईट वाटत आहे. डॉक्टरांनी सर्व प्रयत्न केल्यानंतरही त्याला वाचवण्यात अपयश आलं. या कठीण प्रसंगी आमच्या सद्भावना त्याच्या कुटुंबियांबरोबरच मित्र परिवारासोबत आहेत,” असं या पत्रकात म्हटलं आहे.
हेही वाचा : Captain Rohit Sharma : रोहित शर्मावर संघ व्यवस्थापन नाराज; IPL 2025 नंतर कर्णधारपदाबाबत मोठा निर्णय घेणार..
अॅडलेड टर्फ क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार, तापमान 42 डिग्रींच्या वर गेल्यास सामना रद्द केला जातो. 40 डिग्रीमध्येही सामने खेळवले जातात. अशा सामन्यांमध्ये खेळाडूंना अतिरिक्त ब्रेक दिले जातात. तसेच त्यांना वेळोवेळी पाणी पिण्याचाही सल्ला दिला जात असतो. अती उष्णता जाणवत असल्यास आराम करण्याची मूभा देखील असते.