सौजन्य - prithvishaw पृथ्वी शॉने केलं 'बंड', संघातून वगळल्याचा जाहीर निषेध; पुन्हा आली साईबाबांची आठवण
मुंबई : पृथ्वी शॉला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. IPL 2025 च्या मेगा लिलावात न विकल्या गेल्यानंतर, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही त्याची कामगिरी विशेष नव्हती. आता 17 डिसेंबर रोजी विजय हजारे ट्रॉफीसाठी जाहीर झालेल्या मुंबई संघातूनही त्याला वगळण्यात आले आहे. या ताज्या घडामोडीनंतर, भारताच्या उजव्या हाताच्या स्फोटक सलामीवीराने सोशल मीडियावर आपली निराशा व्यक्त केली आहे.
पृथ्वीने केली पोस्ट
He's not gonna improve… #PrithviShaw pic.twitter.com/rsuWR9hPoZ — Jatin Sharma (@jatincricket) December 17, 2024
इंस्टा स्टोरीवर पृथ्वीने काय लिहिले?
आपल्या आराध्य दैवत साईबाबांची आठवण करून, 25 वर्षीय पृथ्वी शॉने इंस्टाग्राम स्टोरीवर लिस्ट अ क्रिकेट रेकॉर्ड शेअर केला आणि लिहिले, ‘देवा मला सांग मला आणखी काय पहायचे आहे? 65 डावात 55.7 च्या सरासरीने 3399 धावा आणि 126 चा स्ट्राईक रेट पुरेसा नसेल तर मी काय करू? माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आशा आहे की, लोकांचा माझ्यावर अजूनही विश्वास आहे कारण मी नक्कीच पुनरागमन करेन. ओम साई राम’
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये १९७ धावा
गेल्या रविवारी मुंबईने इंडियन डोमेस्टिक क्रिकेट टी-२० स्पर्धा म्हणजेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघात पृथ्वी शॉ देखील होता. शॉने नऊ सामन्यांमध्ये १९७ धावा करीत या स्पर्धेत आपली चमक दाखवली, परंतु यात एकाही अर्धशतकाचा समावेश नाही. फायनलमध्ये मध्य प्रदेशचा पाच गडी राखून पराभव केल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला होता, ‘मला वाटते की तो नैसर्गिकरित्या प्रतिभावान खेळाडू आहे. त्याच्याकडे इतकं टॅलेंट आहे जे इतर कुणाकडे नाही. त्याला फक्त शिस्तीने काम करावे लागेल. असे केल्याने तो मोठ्या उंचीला स्पर्श करू शकतो.
श्रेयस अय्यर मुंबईचे कर्णधार असणार
विजय हजारे ट्रॉफी 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल, ज्यासाठी मुंबईचा 19 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. जे पुढीलप्रमाणे आहेः श्रेयस अय्यर (कर्णधार), आयुष म्हात्रे, अंगकृष्ण रघुवंशी, जय बिस्ता, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, सिद्धेश लाड, हार्दिक तामोरे, प्रसाद पवार, अथर्व अंकोलेकर, तनुष कोटियन, शार्दुल ठाकूर, रोशन ठाकूर. जुनेद खान, हर्ष तन्ना आणि विनायक भोईर.