
पुणे क्रिकेट क्लबच्या मैदानावर पार पडली साखळी फेरी
‘डीएसपी करंडक मान्सून लीग’ला उत्साहात सुरूवात
पुणेरी स्ट्रायकर्स संघाने प्रथम केली फलंदाजी
पुणे: डीएसपी स्पोर्ट्स अँड इव्हेंटस यांच्या सौजन्याने आयोजित ‘डीएसपी करंडक मान्सून लीग’ मिश्र कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धेत पुणेरी स्ट्रायकर्स क्लब आणि कॉर्पोरेट क्रशर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांवर (Cricket) मात करत स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे.
वाघोली येथील पुणे क्रिकेट क्लबच्या मैदानावर पार पडलेल्या साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात पुणेरी स्ट्रायकर्स क्लबने प्लॅटिनम क्रिकेट क्लबचा ४६ धावांनी पराभव केला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पुणेरी स्ट्रायकर्स संघाने २० षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात १७४ धावांची भक्कम धावसंख्या उभारली. यात ऋतुराज तावरे याने ५४ चेंडूंत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ७८ धावांची उत्कृष्ट अर्धशतकी खेळी केली. त्याला शुभम हुलगे (३२ धावा) आणि निखिल जी (२० धावा) यांनी चांगली साथ दिली. प्लॅटिनम क्लबकडून विकास नेहे याने २६ धावांत ३ गडी बाद केले.
दक्षिण कोरियात पुण्याचा डंका! जागतिक तायक्वांदो स्पर्धेत भारताची ३ सुवर्णांसह २० पदकांची कमाई
ऋतुराज तावरेला ‘सामनावीर’ पुरस्कार
विजयासाठी १७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना प्लॅटिनम क्रिकेट क्लबचा डाव १६.२ षटकांत सर्वबाद १२८ धावांवरच आटोपला. प्लॅटिनम संघाकडून अभिजीत काळे (४२ धावा) आणि प्रज्वल साळुंखे (२३ धावा) यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुणेरी स्ट्रायकर्सच्या गोलंदाजांसमोर त्यांचा निभाव लागला नाही. आदेश उपाध्यायने १३ धावांत ३ गडी बाद केले, तर महेश चव्हाण आणि निखिल जी यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ७८ धावांची नाबाद खेळी करणाऱ्या ऋतुराज तावरेला ‘सामनावीर’ घोषित करण्यात आले.
कॉर्पोरेट क्रशर्सची १५ धावांनी मात
दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात कॉर्पोरेट क्रशर्स संघाने इलाइट ११ संघावर १५ धावांनी संघर्षपूर्ण विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना कॉर्पोरेट क्रशर्सने २० षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात १६८ धावा केल्या. आदर्श चढ्ढा याने ५१ चेंडूंत ९ चौकारांसह नाबाद ६५ धावांची संयमी व आक्रमक खेळी केली. वैभव सक्सेनाने ३२ तर निशित कुमारने नाबाद २१ धावांचे योगदान दिले.प्रतिउत्तरा दाखल इलाइट ११ संघाचा संपूर्ण डाव १९ षटकांत १५३ धावांवर गारद झाला. हेमंत चौधरीने २६ चेंडूंत ४१ धावांची तर मनीष अहलावतने २० धावांची खेळी केली. कॉर्पोरेट क्रशर्सच्या गोलंदाजांनी सुरेख मारा करत इलाइट ११ ला रोखले. ज्ञानेश कुंडे, नवनीत मेहता, आदर्श चढ्ढा आणि प्रजेश यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. फलंदाजीत नाबाद ६५ धावा आणि गोलंदाजीत २ गडी बाद करणाऱ्या आदर्श चढ्ढाला ‘सामनावीर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
१० संघांमध्ये रंगणार चषक
या स्पर्धेत साई सत्यम क्रिकेट क्लब, कॉर्पोरेट क्रशर्स, प्लॅटिनम क्रिकेट क्लब, मायटी स्टार्स, पुणेरी स्ट्रायकर्स, रॉयल रिव्हेंजर्स, लेथल इलेव्हन, इलाइट ११, फिअरलेस फायटर्स आणि बीकेसी ११ असे एकूण १० संघ विजेतेपदासाठी आमनेसामने असणार आहेत, अशी माहिती स्पर्धा संचालक दिनेश पाटील यांनी दिली. स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या संघांना आकर्षक करंडक व रोख पारितोषिके देऊन गौरवले जाणार आहे.