चिमुकल्या खेळाडूंची धडाकेबाज कामगिरी
‘सोमेश्वर फाउंडेशन’च्या वतीने ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’चे आयोजन
विविध वयोगटांतील बालखेळाडूंनी केली शानदार कामगिरी
‘पेरी डॉट हॉल’मध्ये पार पडली स्पर्धा
पुणे: माजी आमदार विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त ‘सोमेश्वर फाउंडेशन’च्या वतीने आयोजित ‘विनायकी क्रीडा महोत्सव’ अंतर्गत खुल्या जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत विविध वयोगटांतील बालखेळाडूंनी आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर विजेतेपद पटकावले. यामध्ये रिधान सिंग, आश्वी नागदा, स्वानंद दास, ध्यानम त्रिवेदी, धन्वी पाठक, श्रुवी दुधाने आणि आहिरा खिलारे यांनी आपापल्या गटात अव्वल स्थान मिळवून यश संपादन केले.
पाषाण-सुस रस्त्यावरील ‘सनीज वर्ल्ड’ येथील ‘पेरी डॉट हॉल’मध्ये ही स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत ६ वर्षांखालील विशेष मुलांच्या क्वॉड प्रकारात ‘चॅम्पियन स्केटिंग क्लब’च्या रिधान सिंग याने प्रथम क्रमांक पटकावला. रिधान हा पवार पब्लिक शाळेत वरिष्ठ शिशुवर्गात (सिनियर केजी) शिकत आहे. तर, याच वयोगटातील मुलींच्या विभागात ‘पँथर्स क्लब’च्या आश्वी नागदा हिने प्रथम क्रमांक पटकावला. आश्वी ही युरो स्कूलमध्ये वरिष्ठ शिशुवर्गात शिकत आहे.
Inter-IT Football: ११-० चा धमाका! सायबेजच्या खेळाडूंचा मैदानात धुमाकूळ, डिलॉइट भुईसपाट
विविध प्रकारांतील विजेते खेळाडू
विशेष मुलांच्या कुमार गटात ‘आरडी एक्स्ट्रीम क्लब’च्या स्वानंद दासने तर, इनलाइन प्रकारात ‘चॅम्पियन’च्या क्रिश सूर्यवंशीने विजेतेपद पटकावले. रिक्रीएशनल इनलाइन प्रकारात ‘युवराज स्पोर्ट्स क्लब’च्या ध्यानम त्रिवेदी याने विजेतेपदाचा मान पटकावला. ध्यानम हा साधू वासवानी शाळेत कनिष्ठ शिशुवर्गात (ज्युनियर केजी) शिक्षण घेत आहे.विशेष मुलींच्या गटात ‘आरडी एक्स्ट्रीम क्लब’च्या धन्वी पाठक हिने प्रथम क्रमांक पटकावला. तर, प्रोफेशनल इनलाइन प्रकारात श्रुवी दुधाने हिने अव्वल स्थान मिळवले.
श्रुवी ही संस्कृती शाळेत वरिष्ठ शिशुवर्गात शिकत आहे. रिक्रीएशनल इनलाइन प्रकारात ‘द व्हील्स क्लब’च्या आहिरा खिलारे हिने पहिले स्थान मिळवले. आहिरा ही कॅम्ब्रिज इंटरनॅशनल शाळेत वरिष्ठ शिशुवर्गात शिकत आहे. तसेच, १२ ते १५ वर्षांखालील मुलांच्या गटात क्वॉड प्रकारात ‘एलएक्सटी’च्या कणव श्रीवास्तवने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले, तर मुलींच्या गटात ‘चॅम्पियन्स’च्या साईस्वरा रेवा हिने विजेतेपदाला गवसणी घातली.
विराट कोहलीची RCB सुपरहिट! विक्रमी ब्रँड व्हॅल्यूने क्रिकेटविश्वात रचला जागतिक इतिहास
दिग्गजांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन
या स्पर्धेचे उद्घाटन ‘स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र’चे सचिव तथा राष्ट्रीय पोलिस पदक विजेते राजेंद्र जाधव (सहाय्यक पोलिस आयुक्त, निवृत्त) यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी स्पर्धा समन्वयक अभिजीत मोहिते, नरेंद्र जाधव, मुख्य पंच तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशोक गुंजाळ, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक पुष्कर कुलकर्णी, ‘व्हेल ३६०’च्या डॉ. मोनिका सुर्वे आणि डॉ. उत्तरा अभ्यंकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.






