MI vs GT : आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील 9 वा सामना काल (दि. 29 मार्च) मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. गुजरातमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 36 धावांनी दणदणीत पराभव केला आहे. या हंगामातील हा मुंबई इंडियन्सचा सलग दूसरा पराभव ठरला. या हंगामात मुंबई इंडियन्सची अवस्था वाईट झालेली दिसून येत आहे. टीम खराब फॉर्ममधून जात असल्याचे पहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे टीमचा अनुभवी खेळाडू रोहित शर्माचा सुद्धा फॉर्म हवरला आहे. गेल्या दोन सामन्यांपासून त्याचा फ्लॉप शो सुरूच आहे. पण, तरी देखील रोहितने गेल्या शनिवारी गुजरात टायटन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात मोठी कामगिरी आपल्या नावे केली आहे.
चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून खेळतान रोहित शर्मा खाते न उघडताच माघारी परतला होता. तर गुजरातविरुद्धच्या सामन्यात तो 8 धावा करून मोहम्मद सिराजचा बळी ठरला होता. दोन चौकार मारून त्याने या आठ धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याने त्या 2 चौकारांमुळे मोठी कामगिरी केली आहे. आयपीएल इतिहासात 600 चौकार मारणारा तो तिसरा भारतीय फलंदाज बनला आहे.
गुजरात टायटन्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यात रोहित शर्माला मोठी जास्त वेळ मैदानात तग धरता आला नाही. त्याने 4 चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने केवळ 8 धावा केल्या. मोहम्मद सिराजने त्याला क्लीन बोल्ड केले. रोहित शर्माने त्या 2 चौकारच्या मदतीने आयपीएलमध्ये 600 चौकार पूर्ण केले आहेत. आयपीएलमध्ये 600 किंवा त्याहून अधिक चौकार मारणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी विराट कोहली आणि शिखर धवन यांनी अशी कामगिरी केली आहे.
हेही वाचा : DC vs SRH : विशाखापट्टणममध्ये कोण मारणार बाजी, दिल्ली की हैदराबाद? जाणून घ्या संभाव्य प्लेइंग 11
रोहित शर्माने डेक्कन चार्जर्स संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तो 2011 मध्ये मुंबई इंडियन्स संघात सामील झाला आणि तेव्हापासून तो मुंबई संघाचा एक महत्त्वाचा भाग राहिला आहे. त्याने आतापर्यंत 259 आयपीएल सामन्यांमध्ये 6636 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये दोन शतके आणि 43 अर्धशतकांचा समावेश आहे.
हेही वाचा : GT vs MI : शुभमन गिलच्या नावे अनोखा विक्रम : एकाही भारतीयाला जमलं नाही, ते जीटीच्या कर्णधाराने करून दाखवलं…
नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात गुजरातने मुंबुईला पराभवाची धूळ चारली. या विजयाने गुजरातने आयपीएल 2025 मधील पहिला विजय आपल्या नवे केला, तर मुंबईला मात्र लागोपाठ दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 8 गडी गमावून 196 धावांचे लक्ष्य दिले होते. 197 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची अवस्था वाईट झाली आणि 6 गड्यांच्या मोबदल्यात मुंबई 160 धावापर्यंतच मजल मारू शकली. त्यामुळे त्यांचा 36 धावांनी पराभव झाला.