सचिन खिलारीने जिंकले गोल्ड मेडल (फोटो- ट्विटर)
जपानमधील नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताच्या सचिन सर्जेराव खिलारी याने इतिहास रचला आहे. पुरुष शॉट पुट F46 क्रीडा प्रकारात सचिनने सुवर्ण पदक जिंकले आहे. तसेच त्याने एका नवीन नव्या आशियाई पॅरा गेम्स रेकॉर्डची नोंद देखील केली. या क्रीडा प्रकारात भारताने तीनही पदकांवर शिक्कामोर्तब केले आहे.
Asian Para Games : पोलिओवर मात, जिद्दीने गाठले यश! अशोक मलिक यांना पॉवरलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या सचिनने मागील वर्षी आशियाई पॅरा गेम्समध्ये जिंकलेले आपले सुवर्ण पदक कायम ठेवले आहे. सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात १५.८७ मीटर लांब थ्रो करत पहिले स्थान पटकावले आहे. भारताच्या मोहम्मद यासिरने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात १५.०६ मीटर थ्रो करत रौप्य पदकावर आपले नाव कोरले. भारताच्याच परवीन यांनी १४.९४ मीटर अंतर पार करत तिसरे स्थान मिळवले आणि कांस्य पदक जिंकले आहे.
पॅरा क्रीडा स्पर्धांमध्ये ‘F46’ हा वर्ग महत्वाचा समजला जातो. ज्यांच्या अवयवांमध्ये (हातांमध्ये) शारीरिक अक्षमता किंवा कमतरता असते अशा खेळाडूंसाठी हा वर्ग तयार करण्यात आला आहे. या वर्गातील खेळाडू उभे राहून स्पर्धांमध्ये भाग घेतात. शॉट पुट किंवा इतर थ्रोइंग इव्हेंट करताना खेळाडूंना हाताच्या संपूर्ण ताकदीऐवजी आपल्या कंबर आणि पायांच्या ताकदीचा वापर करून गोळा किंवा थाळी फेकावी लागते. यासाठी प्रचंड शारीरिक संतुलन आणि ताकदीची आवश्यकता लागते.
जपानमधील नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताच्या खेळाडूंनी आपली शानदार कामगिरी सुरूच ठेवली आहे. महिलांच्या ६७ किलो वजनी गटात भारताच्या कस्तूरी राजमणि यांनी भारताला रौप्य पदक जिंकून दिले आहे. तमिळनाडूच्या रहिवासी असलेल्या कस्तूरी यांनी आपल्या तिसऱ्या आणि अंतिम प्रयत्नात १०८ किलो वजन यशस्वीपणे उचलत दुसरे स्थान पटकावले आणि भारताच्या पदकतालिकेत आणखी एक पदक जिंकले.






