
T20 World Cup 2026 दरम्यानच 'या' दिग्गज खेळाडूच्या वडिलांचे निधन (Photo Credit - X)
क्षेमा संगकारा हे कँडीमधील अत्यंत सन्माननीय नागरिक होते. ते पेशाने वकील असले तरी, कुमार संगकारा यांचे ते पहिले प्रशिक्षक होते. कुमारच्या बालपणी क्षेमा संगकारा त्याच्या खेळाबाबत आणि शिस्तीबाबत अत्यंत कडक होते. आपल्या मुलांनी खेळाच्या मैदानात सर्वोत्तम कामगिरी करावी यासाठी ते दररोज कुमार आणि त्याच्या भावांच्या प्रशिक्षणासाठी तासनतास वेळ द्यायचे.
🚨 𝗕𝗥𝗘𝗔𝗞𝗜𝗡𝗚 Father of Kumar Sangakkara, senior lawyer Kshema Sangakkara, has passed away. A respected Attorney-at-Law in Kandy, he was widely admired in legal circles and the community for his integrity and service. His funeral will be held on March 4 in Kandy.… pic.twitter.com/45o0vdt4td — Cricketangon (@cricketangon) March 3, 2026
संगकारा कुटुंबाने जारी केलेल्या अधिकृत पत्रकात म्हटले आहे की, “आम्हाला हे सांगताना अत्यंत दुःख होत आहे की, प्रसिद्ध वकील क्षेमा संगकारा यांचे निधन झाले आहे. ते कुमारी यांचे पती आणि तुषारी, वेमिंद्रा, सारंगा व कुमार यांचे प्रिय वडील होते. त्यांचे कुटुंब, मित्र आणि सहकारी त्यांना सदैव स्मरणात ठेवतील.”
श्रीलंकेच्या क्रिकेट इतिहासात कुमार संगकाराला ‘महानतम’ खेळाडू बनवण्यात त्याच्या वडिलांचा सर्वात मोठा वाटा होता. कुमारने अनेकदा आपल्या मुलाखतींमध्ये वडिलांच्या शिस्तीचा आणि मार्गदर्शनाचा उल्लेख केला आहे. निवृत्तीच्या वेळी दिलेल्या आपल्या भावूक भाषणातही कुमारने आपल्या यशाचे श्रेय वडिलांना देत त्यांचे आभार मानले होते. संगकाराने आपल्या कारकिर्दीत धावांचा जो डोंगर उभा केला, त्याचा पाया त्याच्या वडिलांनीच रचला होता.
कुमार संगकारा सध्या आयपीएलमधील (IPL) राजस्थान रॉयल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि ‘डायरेक्टर ऑफ क्रिकेट’ म्हणून कार्यरत आहे. टी-२० विश्वचषक २०२६ च्या धामधुमीत ही दुःखद बातमी समोर आल्याने क्रिकेट विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे. राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझी आणि जगभरातील क्रिकेटपटूंनी संगकारा कुटुंबाचे सांत्वन केले आहे.
क्षेमा संगकारा यांच्या निधनाचे वृत्त समजताच सोशल मीडियावर क्रीडाप्रेमी आणि दिग्गज खेळाडूंनी श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली आहे. एका शिस्तप्रिय पित्याने श्रीलंकेला जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवून देणारा खेळाडू घडवला, अशा शब्दांत चाहत्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.