अफगाणिस्तान(फोटो - सोशल मिडिया)
Afghanistan created history in T20 cricket : शुक्रवारी टी २० तिरंगी मालिकेच्या सामन्यात अफगाणिस्तानने युएईचा पराभव केला. या कामगिरीने अफगाणिस्तानने इतिहास घडवला आहे. या विजयासह, अफगाणिस्तानने शारजाह क्रिकेट स्टेडियमवर २९ पैकी तब्बल २० सामने जिंकण्याची किमया साधली आहे. अफगाणिस्तान आता परदेशी भूमीवर एकाच मैदानावर २० सामने जिंकणारा पहिलाच संघ ठरला आहे.
यूएईविरुद्ध सामना जिंकून अफगाणिस्तान संघ त्याच मैदानावर २० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारा जगातील दुसराच संघ ठरला आहे. यापूर्वी, असा पराक्रम बांगलादेश संघाने केला होता. ढाकामधील मीरपूर येथील शेर-ए-बांगला राष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या ४८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी २४ सामने जिंकून बांगलादेशने विक्रम नोंदवला आहे.
आयसीसीकडून मान्यता दिलेल्या पूर्ण सदस्य देशांमध्ये, आतापर्यंत फक्त दोन संघ हा कारनामा करू शकले आहेत. ज्या संघाने एकाच मैदानावर २० किंवा त्याहून जास्त सामने जिंकले आहेत. बांगलादेश आणि अफगाणिस्ताननंतर, एकाच मैदानावर सर्वाधिक टी-२० विजय मिळवण्याचा मान हा पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या संघांना जातो.
पाकिस्तान संघाने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर १८ आणि लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर १६ टी-२० सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे, तर दक्षिण आफ्रिकेने जोहान्सबर्गमधील वॉन्डरर्स स्टेडियमवर आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या २६ टी-२० सामन्यांपैकी १४ सामने आपल्या खिशात टाकले आहेत. पाकिस्तान संघाला या यादीत पोहोचण्याची नामी संधी असणार आहे. आशिया कप दरम्यान पाकिस्तानचा संघ पराक्रम करू शकतो. त्याआधी, रविवारी, ७ सप्टेंबर रोजी टी-२० तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात अफगाणिस्तानचा सामना आता त्याच मैदानावर पाकिस्तानशी सोबत होणार आहे.
हेही वाचा : ‘मी त्यांना पसंत नव्हतो…’, निवृत्ती घेताच अमित मिश्राचा ‘या’ दोन भारतीय माजी कर्णधारांवर केला हल्लाबोल..
अफगाणिस्तानने सामन्यापूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाने ४ गडी गमावून १७० धावा उभारल्या होत्या. ज्यामध्ये अफगाणिस्तानकडून रहमानउल्लाह गुरबाजने ४०, इब्राहिम झदरानने ४८ धावा फटकावल्या होत्या. युएईकडून हैदर अलीने २ विकेट मिळवल्या.
प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या यूएई संघ ५ विकेट गमावून फक्त १६६ धावाच करू शकला. ज्यामध्ये मुहम्मद वसीमने ४४, आसिफ खानने ४० धावा केल्या तरी ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. अफगाणिस्तानकडून फरीद अहमदने, मुज्बी उर रहमानने आणि नूर अहमदने प्रत्येकी १ विकेट घेतली, परिणामी अफगाणिस्तानने ५ धावांनी सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला.