टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉनवे(फोटो-सोशल मीडिया)
Tom Latham and Devon Conway World Record : न्यूझीलंडच्या टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉनवे यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात धुमाकूळ घातला आहे. न्यूझीलंडच्या डावात पहिल्या विकेटसाठी या दोघांनी ३२३ धावांची भागीदारी रचून विश्वविक्रम केला आहे. न्यूझीलंड क्रिकेटच्या इतिहासात किवी सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी ३०० किंवा त्याहून अधिक धावांची भागीदारी करण्याची ही दुसरीच वेळ ठरली आहे. याआधी १९७२ मध्ये टेरी जार्विस आणि ग्लेन टर्नर यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध जॉर्जटाऊन कसोटी सामन्यात पहिल्या विकेटसाठी ३८७ धावांची भागीदारी रचण्याची किमया साधली होती.
कसोटीत पहिल्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विश्वविक्रम ग्रॅमी स्मिथ आणि नील मॅकेन्झी यांच्या नावावर जमा आहे. २००८ मध्ये बांगलादेशविरुद्ध चितगाव कसोटी सामन्यात या जोडीने पहिल्या विकेटसाठी ४१५ धावांची महाभागीदारी रचली होती.
टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉनवे यांनी न्यूझीलंडमधील कसोटी सामन्यात सर्वाधिक सलामी भागीदारीचा नवा विक्रम रचला गेला. मागील विक्रम २७६ धावांचा रचण्यात आला होता, तो म्हणजे स्टीवी डेम्पस्टर आणि जॅकी मिल्स (१९३० मध्ये वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड) आणि शेर्विन कॅम्पबेल आणि एड्रियन ग्रिफिथ (१९९९ मध्ये हॅमिल्टनमध्ये वेलिंग्टन विरुद्ध न्यूझीलंड) यांच्या नावावर नोंदवण्यात आला होता.
कर्णधार टॉम लॅथमने आपले १५ वे कसोटी शतक पूर्ण केले आहे आणि कर्णधार म्हणून त्याचे पाचवे शतक ठरले आहे. त्याच्यासोबत डेव्हॉन कॉनवेने देखील शानदार शतक झळकवले. २४६ चेंडूत १३७ धावा काढून लॅथम माघारी गेला. त्याच्या डावात टॉम लॅथमने १५ चौकार आणि एक षटकार मारला, तर डेव्हॉन कॉनवे १७८ धावांवर नाबाद आहे.






