विश्वचषकापूर्वी कोच गौतम गंभीर सिद्धिविनायकाच्या चरणी(फोटो-सोशल मीडिया)
Gautam Gambhir offered prayers at the Siddhivinayak Temple : टी-२० विश्वचषक २०२६ या स्पर्धेचे रण ७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या विश्वचषकासाठी सर्व संघांनी आपापली तयारी पूर्ण केली आहे. या स्पर्धेचे यजमानपद भारतासह श्रीलंकेकडे असणार आहे. ब्लु आर्मी देखील या मेगा स्पर्धेसाठी विश्वचषकासाठी सज्ज झाला हे. विश्वचषक सुरू होण्याच्या दोन दिवस आधी, भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीरने सिद्धिविनायक मंदिरात भेट देऊन संघाच्या विजयासाठी प्रार्थना देखील केली.
गुरुवारी, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन गणरायचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी स्पर्धेत भारताच्या यशासाठी प्रार्थना देखील केली. गौतम गंभीरने या वर्षी जानेवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी मध्य प्रदेशातील माँ बगलामुखी मंदिराला भेट दिली होती. तसेच मालिकेदरम्यान त्यांनी उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिराला देखील भेट देऊन दर्शन घेतले होते. त्यानंतर टी-२० मालिकेदरम्यान गुवाहाटी येथील टी-२० सामन्याआधी त्यांनी कामाख्या मंदिरात जाऊन प्रार्थना केली होती.
हेही वाचा : ICC T20I Ranking : आयसीसी टी-20 क्रमवारीत इशानची उंच उडी! पाकिस्तानी सॅम अयुब बनला नंबर-1 अष्टपैलू खेळाडू
भारतीय संघ सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येत आहे. अलिकडेच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेमध्ये भारतीय संघाने ४-१ अशी बाजी मारली होती. बुधवारी झालेल्या सराव सामन्यात देखील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार प्रदर्शन केले. २०२४ मध्ये गौतम गंभीरची भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने गेल्या वर्षी आशिया कपचे जेतेपद जिंकले. टी-२० स्वरूपातही भारताने आपली कामगिरी सुधारली आहे.
टी-२० विश्वचषक २०२६ चे भारत आणि श्रीलंका सह-यजमानपद भूषवणार आहेत. भारतीय संघ ७ फेब्रुवारी रोजी पहिला सामना अमेरिकेविरुद्ध खेळून आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. त्यानंतर १२ फेब्रुवारी रोजी नामिबियाविरुद्ध सामना होणार आहे. वेळापत्रकानुसार, १५ फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना होणार आहे, परंतु हा सामना सध्या अनिश्चित अशा परिस्थितिमध्ये आहे. पाकिस्तान सरकारकडून त्यांच्या संघाला भारताविरुद्ध हा सामना खेळण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. भारतीय संघ १८ फेब्रुवारी रोजी नेदरलँड्सविरुद्ध शेवटचा लीग सामना खेळेल.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, अभिषेक शर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, इशान किशन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग.






