क्रेग एर्विन(फोटो-सोशल मीडिया)
ZIM VS SL : झिम्बाब्वे आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेला आज २९ ऑगस्टपासून सुरूवात होत याहे. परंतु, अशातच सामना सुरू होण्यापूर्वीच झिम्बाब्वेला मोठा झटका बसला आहे. झिम्बाब्वे संघाचा कर्णधार क्रेग एर्विन दुखापतीमुळे या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. या मालिकेत एर्विनच्या जागी आता शॉन विल्यम्सला कर्णधार बनवण्यात आले आहे.
क्रेग एर्विन पायाच्या दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. गुरुवारी करण्यात आलेल्या एमआरआय अहवालात एर्विनच्या पायाच्या दुखापतीबद्दल माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्याला मालिकेतून बाहेर पडावे लागले आहे. झिम्बाब्वे संघासाठी क्रेग एर्विनला वगळणे हा मोठा धक्का मानला जात आहे. तो केवळ चांगला कर्णधारच नाही तर तो एक चांगला फलंदाज देखील आहे, त्याच्या जाण्याने संघाची बळकटी कमी झाली आहे.
हेही वाचा : BCCI मध्ये मोठा संघटनात्मक बदल! नव्या कार्यकारी अध्यक्षपदी राजीव शुक्ला यांची नियुक्ती
४० वर्षीय एर्विनने आतापर्यंत १२८ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने ३६०० धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने ४ शतके आणि २३ अर्धशतके झळकावली आहेत. एर्विनच्या जागी ब्रेंडन टेलरला संघात स्थान देण्यात आले आहे. चार वर्षांनंतर टेलर संघात पुनरागमन करणार आहे. त्याने २०२१ मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता.
मॅच फिक्सिंगशी संपर्क आल्याची सूचना न दिल्याबद्दल जानेवारी २०२२ मध्ये ब्रेंडन टेलरवर आयसीसीकडून बंदी घालण्यात आली होती. टेलर साडेतीन वर्षांच्या बंदीनंतर पुन्हा संघात पुनरागमन करत आहे. यापूर्वी टेलरने कसोटी सामन्यांमध्ये पुनरागमन केले होते. ३९ वर्षीय ब्रेंडन टेलरची एकदिवसीय कारकीर्द शानदार राहिली आहे. त्याने २०५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ११ शतके आणि ३९ अर्धशतकांसह ६६८४ धावा फटकावल्या आहेत.
हेही वाचा : २१ वर्षीय फलंदाजाचा दुलीप ट्रॉफीमध्ये धुमाकूळ! दानिश मालेवारचे नॉर्थ ईस्टविरुद्ध द्विशतकी तडाखा
झिम्बाब्वे आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवल्यानंतर या दोन संघामध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका देखील खेळवण्यात येणार आहे. ७ ते ८ सप्टेंबर दरम्यान टी २० मालिकेतील तीन सामने खेळले जाणार आहे. त्यानंतर श्रीलंकेचा संघ आशिया कप २०२५ साठी दुबईला रवाना होणार आहे. ९ सप्टेंबरपासून आशिया कप स्पर्धेला सुरुवात होत आहे.
बेन कुरन, ब्रायन बेनेट, ब्रेंडन टेलर, सिकंदर रझा, शॉन विल्यम्स (कर्णधार), क्लाइव्ह मधेवेरे, वेस्ली मधेवेरे, ब्रॅड इव्हान्स, टोनी मुन्योंगा, जोनाथन कॅम्पबेल, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी, ट्रेव्हर ग्वांडू, न्यूमन न्यामुरी, एरन न्यामुरी.