डिजिटल साक्षरता (फोटो- ai gemini)
‘डिजिटल साक्षरता’ची व्याख्याच बदलताना दिसून
‘डिजिटल साक्षरता म्हणजे केवळ उपकरण वापरण्याचे कौशल्य नाही
२०२५ मध्ये पुणे शहरात ७४३ सायबर गुन्ह्यांची नोंद
सुनयना सोनवणे / पुणे: मोबाईल हाताळता येतो, यूपीआयवरून पैसे पाठविता येतात, ऑनलाइन खरेदी करता येते म्हणजे आपण डिजिटल साक्षर झालो, असे समजण्याची वेळ आता मागे पडली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), डीपफेक, बनावट संकेतस्थळे आणि खोटी माहितीच्या वाढत्या वापरामुळे ‘डिजिटल साक्षरता’ची व्याख्याच बदलत आहे. मोबाईलवर आलेला संदेश, फोटो, व्हिडिओ किंवा आवाज खरा आहे की कृत्रिम पद्धतीने तयार केलेला, हे ओळखणे हीच आता डिजिटल साक्षरतेची नवी कसोटी ठरत आहे.
पुण्यासारख्या तंत्रज्ञानाच्या वापरात आघाडीवर असलेल्या शहरात ही गरज अधिक जाणवते. ऑनलाइन बँकिंगपासून सरकारी सेवांपर्यंत बहुतांश व्यवहार मोबाईलवर आले आहेत. त्याचवेळी नागरिकांची वैयक्तिक माहिती, छायाचित्रे आणि आवाज यांचा वापर करून विश्वास निर्माण करण्याचे नवे मार्गही तयार झाले आहेत.
‘डिजिटल साक्षरता म्हणजे केवळ उपकरण वापरण्याचे कौशल्य नाही. समोरची माहिती कुठून आली, तिची सत्यता कशी तपासायची आणि आपली माहिती कुठे द्यायची नाही, याचे भान असणेही तितकेच महत्त्वाचे आहे,’ असे तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.
पूर्वी : मोबाईल, इंटरनेट आणि ऑनलाइन व्यवहार वापरता येणे.
आता :
* एआय निर्मित फोटो-व्हिडिओ ओळखणे
* डीपफेक आणि बनावट आवाजाची शक्यता तपासणे
* बनावट संकेतस्थळ व संदेश ओळखणे
* सामाजिक माध्यमांवरील माहितीची पडताळणी करणे
* ॲपला दिल्या जाणाऱ्या परवानग्या समजून घेणे
* पासवर्ड, पासकी आणि बहुपदरी सुरक्षा वापरणे
– ही माहिती कुठून आली?
– वेबसाइट अधिकृत आहे का?
– फोटो किंवा व्हिडिओ खरा आहे का?
– समोरची व्यक्ती खरोखर तीच आहे का?
– विशेषतः ‘ताबडतोब पैसे पाठवा’, ‘खाते बंद होणार’, ‘ही संधी शेवटची’ अशा संदेशांमध्ये घाई न करता स्वतंत्रपणे माहिती तपासणे आवश्यक आहे.
पुण्याची सायबर वास्तवता
२०२५ मध्ये पुणे शहरात ७४३ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली असून नागरिकांचे सुमारे २२१ कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे डिजिटल कौशल्याबरोबरच डिजिटल सुरक्षिततेचे भानही आवश्यक झाले आहे.
आज प्रश्न ‘मोबाईल वापरता येतो का?’ एवढाच राहिलेला नाही. मोबाईलवर दिसणारी माहिती खरी आहे की नाही, हे ठरवता येते का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. विशेषतः एआयमुळे तयार होणाऱ्या बनावट मजकूर, चित्र, आवाज आणि व्हिडिओच्या काळात माहितीची पडताळणी करण्याची सवय प्रत्येकाने लावणे गरजेचे आहे.
– विनीत गायकवाड, तंत्रज्ञान तज्ञ






