MPSC पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, अनियमितता, मूल्यमापनातील संशय आणि निकालातील गोंधळाच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांचा संताप आता रस्त्यावर उतरला आहे. MPSC अध्यक्ष आणि सचिवांचा राजीनामा घ्यावा, या प्रमुख मागणीसाठी सोमवारी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढला.
विद्यार्थी आणि विविध विद्यार्थी संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा मोर्चा ओंकारेश्वर मंदिर चौकातून सुरू झाला. त्यानंतर मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणावी आणि विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यांच्या आवाहनानंतर माजी मंत्री आणि आमदार डॉ. विश्वजीत कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते मोहन जोशी, प्रशांत जगताप, दीप्ती चवधरी, भाऊसाहेब आजबे, हनुमंत पवार, आमिर शेख यांच्यासह NSUI, युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले.
यावेळी बोलताना विश्वजीत कदम यांनी MPSC परीक्षा व्यवस्थेवरून सरकारवर निशाणा साधला. राज्यातील लाखो विद्यार्थी अनेक वर्षे मेहनत घेऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. मात्र, परीक्षा प्रक्रियेबाबत वारंवार प्रश्न उपस्थित होत असतील तर त्याची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे, असं कदम म्हणाले.
“MPSC अध्यक्ष आणि सचिवांनी राजीनामा द्यावा. परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणलं पाहिजे,” अशी मागणी विश्वजीत कदम यांनी केली.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत त्यांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे MPSCच्या परीक्षा प्रक्रियेवरून सुरू असलेला वाद आता अधिकच राजकीय रंग घेण्याची शक्यता आहे.
Pune MPSC Student Protest : MPSC पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी






