देशातील पाचव्या सेमीकंडक्टर प्लांटला सरकारची मंजुरी; 2025 पर्यंत येणार पहिली चिप (फोटो सौजन्य - pinterest)
देशातील पाचव्या सेमीकंडक्टर प्लांटला मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत भारतात सेमीकंडक्टर प्लांट उभारण्याच्या केन्स सेमीकंडक्टरच्या प्रस्तावाला सरकारने हिरवा झेंडा दाखवला आहे. या प्रकल्पासाठी मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. या प्रकलपांतर्गत 2025 पर्यंत पहिली चीप तयार केली जाणार आहे. 3307 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पात दरवर्षी 63 लाख चीप तयार करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.
हेदेखील वाचा- YouTube वर सबस्क्रायबर्सची कमाल! कोणत्या क्रिएटर्सना मिळतं सिल्व्हर, गोल्डन आणि डायमंड प्ले बटण?
गुजरातमधील साणंदमध्ये देशातील पाचव्या सेमीकंडक्टर प्लांटची उभारणी केली जाणार आहे. देशातील हा पाचवा आणि गुजरातमध्ये उभारला जाणारा चौथा सेमीकंडक्टर प्लांट आहे. देशात सेमीकंडक्टर इकोसिस्टम तयार करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. यासाठी आतापर्यंत देशात 4 सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यात आले असून आता पाचवा प्लांट उभरण्याची तयारी सुरू झाली आहे. गुजरात व्यतिरिक्त आसाममध्ये एक प्लांट (टाटा समूहाचा) उभारण्यात येणार आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींनी साणंदजवळ अमेरिकन चिप उत्पादक मॅक्रॉनचा प्लांट उभारण्याची घोषणा केली होती.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती देताना माहिती आणि प्रसारण आणि आयटी मंत्री अश्वनी वैष्णव यांनी सांगितलं आहे की, देशात संपूर्ण सेमीकंडक्टर इकोसिस्टमची स्थापना होऊ लागली आहे. देशातील पाचवा सेमीकंडक्टर प्लांट देखील लवकरच उभारला जाणारं आहे. सेमीकंडक्टर उद्योगाबाबत सरकार लवकरच काही धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे संकेत आश्विन वैष्णव यांनी दिले. 2025 च्या अखेरीस पहिले भारतीय बनावटीचे चिप्स येतील असे आश्विन वैष्णव यांनी आधीच सांगितले आहे. वैष्णव म्हणाले की, भारताच्या विकासात सेमीकंडक्टर उद्योग खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. हा उद्योग पोलाद आणि रासायनिक उद्योगांसारखाच आहे ज्यामुळे इतर अनेक उद्योग उभारण्यास मदत होईल. भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उद्योगावरही त्याचा मोठा परिणाम होणार आहे.
हेदेखील वाचा- Xiaomi युजर्ससाठी आनंदाची बातमी! फोनची बॅटरी खराब झाली आहे का? मग कंपनीच्या या ऑफरमध्ये बदलून घ्या
केन्स सेमिकॉनच्या कारखान्यासाठी कंपनीने 46 एकर जमीन संपादित केली आहे. या प्लांटमध्ये उत्पादित होणाऱ्या सेमीकंडक्टरचा मोठा भाग केन्स कंपनी स्वतः खरेदी करेल आणि त्याचा विविध उत्पादनांमध्ये वापर करेल. यामध्ये बनवलेल्या सेमीकंडक्टरचा वापर ऑटोमोबाईल, वीज, इलेक्ट्रिक वाहन, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे उद्योग आदींमध्ये होणार आहे. काही आठवड्यांपूर्वी केन्सने सांगितले होते की भारतातील सेमीकंडक्टर प्लांट तेलंगणामध्ये स्थापित केला जाईल.
तेलंगणा सरकारने देखील याबाबतची घोषणा केली होती. मात्र आता हा प्लांट गुजरात मध्ये उभारण्यात येणार असल्याचं समोर आलं आहे. वैष्णव म्हणाले की, धोलेरा (गुजरात) येथील टाटा समूहाच्या प्लांटचे काम सुरळीतपणे सुरू आहे. त्यासाठी जागा देण्यात आली असून डिझाइनिंगचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याचप्रमाणे अमेरिकन कंपनी मॅक्रॉनच्या कारखान्याच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. आसाममध्ये टाटा समूहाच्या प्लांटच्या बांधकामालाही सुरुवात झाली आहे. देशात सेमीकंडक्टर उद्योगाची परिसंस्था तयार होऊ लागली आहे. 2025 पर्यंत पं चीप तयार केली जाणार आहे.
साणंदमध्येच CG पॉवर हा आणखी एक चिप बनवणारा कारखाना उभारला जात आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणात वाढतील. भारतात बनवलेल्या चिप्सचा बराचसा वापर देशांतर्गत केला जाईल. भारत एक खूप मोठी ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठ आहे. या सर्व उद्योगांना चिप्सची गरज आहे.