फोटो सौजन्य -iStock
आपल्याला कोणत्या अनोळखी नंबरवरून कॉल आला की आपण अनेकदा हा कॉल घेणे टाळतो. किंवा थर्ड पार्टी ॲपच्या मदतीने कॉल आलेला नंबर तपासून पाहतो. पण आपल्या फोनमध्ये यासाठी कोणतेही थर्ड पार्टी ॲप नसेल, तर कोणाचा नंबर आहे हे आपल्याला कळत नाही. तुमच्या या सर्व समस्यांवरील उपाय म्हणून भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण लवकरच एक नवीन सेवा सक्रीय करणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने देशभरात कॉलिंग नेम प्रेझेंटेशन सेवा लागू करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे तुम्हाला कॉलरची ओळख जाणून घेण्यासाठी कोणत्याही थर्ड पार्टी ॲपची गरज भासणार नाही.
कॉलिंग नेम प्रेझेंटेशनच्या मदतीने तुम्हाला कॉलरचे नाव तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसेल. यामुळे कोणत्याही थर्ड पार्टी ॲपशिवाय तुम्ही कॉलरची ओळख जाणून घेऊ शकता. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने दिलेल्या आदेशानुसार टेलिकॉम कंपन्या देशभरात १५ जुलैपासून कॉलिंग नेम प्रेझेंटेशन सक्रीय करणार आहेत. यापूर्वी कॉलिंग नेम प्रेझेंटेशन सेवेची चाचणी मुंबई आणि हरियाणामध्ये घेण्यात आली होती. ही चाचणी यशस्वीरित्या पार पडली. या यशस्वी चाचणीनंतर आता देशभरात कॉलिंग नेम प्रेझेंटेशन सक्रीय होणार आहे. या सेवेमुळे लोक फ्रॉड कॉल्स, स्पॅम आणि फसवणूकीपासून स्वतःचे संरक्षण करू शकतील.
आपण आपल्या फोनमध्ये कॉलरची ओळख जाणून घेण्यासाठी थर्ड पार्टी ॲपची मदत घेतो. पण या थर्ड पार्टी अॅप्सना आपल्या कॉन्टॅक्टचा अॅक्सेस द्यावा लागतो. या परवानगिशिवाय हे थर्ड पार्टी ॲप्स सुरु होत नाही. अशावेळी आपला डेटा लिक होण्याची शक्यता असते. पण आता तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी ॲपची मदत घेण्याची गरज भासणार नाही. कारण लवकरच देशभरात कॉलिंग नेम प्रेझेंटेशन सेवा लागू होणार आहे. या सेवे अंतर्गत तुमच्या फोनवर कोणत्याही अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास त्या कॉलरचे तेच नाव तुमच्या मोबाईल स्क्रिनवर दिसेल जे त्याने सिम खरेदी करताना केवायसी फॉर्ममध्ये भरले होते. ही सेवा कार्यान्वित झाल्यानंतर सायबर गुन्ह्यांनाही काही प्रमाणात आळा बसणार आहे. सरकार आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण या सेवेच्या योग्य अंमलबजावणीवर लक्ष ठेवून आहेत.