फोटो सौजन्य - Social Media
भारतातील अग्रगण्य मर्चंट पेमेंट्स आणि वित्तीय सेवा वितरण करणारी कंपनी पेटीएमने सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीसाठी आपले मजबूत आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचे एकूण उत्पन्न वार्षिक २४% वाढून २,०६१ कोटी रुपये इतके झाले असून, ही वाढ पेमेंट्स आणि वित्तीय सेवांमधील सशक्त कामगिरीमुळे साध्य झाली आहे. कंपनीचा करोत्तर नफा २११ कोटी रुपये इतका झाला असून, फर्स्ट गेम्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या संयुक्त उद्यमाला दिलेल्या १९० कोटी रुपयांच्या कर्जाच्या हानीनंतर नोंदवलेला निव्वळ नफा २१ कोटी रुपये इतका आहे.
कंपनीचा एबिटा (EBITDA) ७% मार्जिनसह १४२ कोटी रुपये इतका झाला आहे. महसुलातील वाढ आणि कार्यक्षम खर्च व्यवस्थापनामुळे कंपनीच्या नफ्यात लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे. योगदान नफा (Contribution Profit) वार्षिक ३५% वाढून १,२०७ कोटी रुपये झाला असून, यात ५९% मार्जिन नोंदवण्यात आले आहे. हे परिणाम पेमेंट प्रोसेसिंगमधील सुधारित मार्जिन आणि वित्तीय सेवांमधील वाढत्या उत्पन्नाचे प्रतीक आहेत.
पेमेंट सर्व्हिसेस विभागाचा महसूल वर्षागणिक २५% वाढून १,२२५ कोटी रुपये झाला आहे, तर ग्रॉस मर्चंट व्हॅल्यू (GMV) २७% वाढून ५.६७ लाख कोटी रुपये इतकी झाली आहे. दरम्यान, मर्चंट सब्स्क्रिप्शनमध्ये २५ लाखांची वाढ होऊन ती १.३७ कोटींवर पोहोचली आहे, जे कंपनीसाठी सर्वकालीन उच्चांक आहे. या वाढीमुळे ओम्नी-चॅनेल मर्चंट पेमेंट्स क्षेत्रातील पेटीएमचे नेतृत्व अधिक बळकट झाले आहे.
कंपनीची रोख शिल्लक (Cash Balance) १३,०६८ कोटी रुपये इतकी असून, त्यामुळे पेमेंट्स आणि वित्तीय सेवांच्या क्षेत्रात विस्तारासाठी आवश्यक आर्थिक लवचिकता उपलब्ध आहे. पेटीएमने नमूद केले आहे की तिची ‘एआय फर्स्ट’ रणनीती आणि मजबूत व्यवसाय मॉडेल सातत्यपूर्ण नफा वाढ व मार्जिन विस्तारास चालना देत आहेत. भविष्यातील वाढीसाठी कंपनीने मजबूत पाया तयार केला असून, पेमेंट्स आणि वित्तीय सेवांमध्ये तंत्रज्ञानावर आधारित प्रगती कायम ठेवण्यावर भर देण्याचा निर्धार कंपनीने व्यक्त केला आहे.






