Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या
मिळालेल्या माहितीनुसार, ब्लूटूथ दोन प्रकारचे असतात. यामध्ये क्लासिक ब्लूटूथ आणि ब्लूटूथ लो एनर्जी (BLE) यांचा समावेश आहे. हे दोन्ही ब्लूटूथ एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळे असतात आणि यांचा वापर देखील पूर्णपणे वेगळा असतो. आता क्लासिक ब्लूटूथ आणि ब्लूटूथ लो एनर्जी या दोन्ही प्रकारांबाबत सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: Pinterest)
क्लासिक ब्लूटूथ सहसा अशा डिव्हाईससाठी वापरले जाते, ज्यांना सतत जास्त डेटा ट्रांसफर करण्याची आवश्यकता असते. उदाहरणार्थ, वायरलेस हेडफोन, ईयरफोन, स्पीकर आणि कारच्या ऑडियो सिस्टिममध्ये क्लासिक ब्लूटूथचा वापर केला जातो. यामध्ये ऑडियो स्ट्रीमिंग सारखी कामं अगदी सहज केली जाऊ शकतात. जेव्हा तुम्ही तुमच्या फोनला ब्लूटूथ स्पीकर कनेक्ट करून गाणी ऐकता किंवा वायरलेस हेडफोन कनेक्ट करून कॉलवर बोलता त्यावेळी ब्लूटूथ क्लासिक टेक्नोलॉजीचा वापर केला जातो. याचा एक तोटा म्हणजे, ब्लूटूथ क्लासिक हे ब्लूटूथ लो एनर्जी (BLE) च्या तुलनेत जास्त वीज वापरते, त्यामुळे कमी बॅटरी लाईफ असलेल्या डिव्हाईससाठी ब्लूटूथ क्लासिक हा चांगला पर्याय मानला जात नाही.
ब्लूटूथ लो एनर्जी बद्दल बोलायचं झालं तर, हे ब्लूटूथ क्लासिक च्या तुलनेत कमी वीज वापरते. याचा वापर सहसा अशा डिव्हाईसमध्ये केला जातो, ज्यांना दिर्घकाळ छोट्या बॅटरीवर काम करायचे आहे. स्मार्टवॉच, फिटनेस बँड, हेल्थ सेंसर, स्मार्ट होम डिव्हाईस आणि अनेक IoT गॅजेट्समध्ये ब्लूटूथ लो एनर्जी टेक्नोलॉजीचा वापर केला जातो. या प्रकारामध्ये सतत जास्त डेटा ट्रांसफर करण्याऐवजी वेळोवेळी कमी डेटा ट्रांसफर केला जातो.
सतत डेटा आणि ऑडिओ ट्रांसफर करणं, यांसारख्या कामांसाठी क्लासिक ब्लूटूथ चांगला पर्याय मानला जातो. तर कमी ऊर्जेवर लहान डेटा पॅकेट पाठवणाऱ्या डिव्हाईससाठी बीएलई (BLE) हा एक चांगला पर्याय आहे.
जर तुम्हाला वायरलेस ईयरफोन, हेडफोन किंवा स्पीकरचा वापर करायचा असेल नक्कीच क्लासिक ब्लूटूथ तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरणार आहे. पण जर तुम्ही स्मार्टवॉच, फिटनेस ट्रॅकर, सेंसर किंवा स्मार्ट होम डिव्हाईसचा वापर करत असाल तर ब्लूटूथ लो एनर्जी चांगला पर्याय ठरणार आहे.






