फोटो सौजन्य -iStock
आपल्याला एखाद्या गोष्टीविषयी माहिती शोधायची असेल तर आपण Google किंवा YouTube वापर करतो. YouTube वर आपल्याला प्रत्येक विषयावरील व्हिडीओ पाहायला मिळतात. शिक्षण, खाद्यपदार्थ, व्यवसाय, शेअर मार्केट, यासांरख्या अनेक विषयांवरील व्हिडीओ आपण YouTube वर पाहू शकतो. YouTube वर आपण चित्रपट देखील पाहू शकतो. काही ब्लॉगर्स YouTube वर त्यांच्या दैनंदिन जीवणाचे व्हिडीओ अपलोड करत असतात. तर काहीजण गाणी, संगीत यासंबंधित व्हिडीओ अपलोड करतात. पण आता व्हिडीओ अपलोड करताना काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. YouTube ने काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या अंतर्गत कोणत्याही व्यक्तिला YouTube वर व्हिडीओ अपलोड करताना नियमांचे पालन करावं लागणार आहे.
या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार, व्हिडीओ अपलोड करताना तुम्हाला घोषणा करावी लागणार आहे की संबंधित व्हिडीओ AI चा वापर करून तयार केला आहे की नाही. जर संबंधित व्हिडीओ AI चा वापर करून तयार करण्यात आला असेल तर त्यावर AI लेबल लावावं लागणार आहे. YouTube ने AI व्हिडिओसाठी आपली मार्गदर्शक तत्त्वे बदलली आहेत. अपलोड केलेला व्हिडिओ AI वापरून तयार केला आहे की नाही, हे युजर्सना सांगाव लागणार आहे. यानंतर YouTube कडून संबंधित व्हिडीओची पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर जर त्या व्हिडीओमध्ये काही गैर आढळल्यास YouTube युजर्सना AI असलेले विशिष्ट व्हिडिओ काढून टाकण्याची विनंती करू शकतो. तसेच तुम्ही एखादा व्हिडीओ पाहात असाल आणि तुम्हाला वाटले की तो व्हिडीओ AI चा वापर करून तयार करण्यात आला आहे, पण त्या व्हिडीओवर AI लेबल नसेल तर तुम्ही याबाबत तक्रार करू शकता.
जेव्हा निवडणुका सुरू असतात किंवा हिंसाचार किंवा आरोग्य आणीबाणी किंवा सेलिब्रिटींशी संबंधित कोणतीही समस्या असो, अशा परिस्थितीत YouTube वरील व्हिडीओमध्ये पारदर्शकता असणं महत्त्वाचे आहे. अनेक व्हिडीओ AI चा वापर करून तयार केले जातात, पण त्यावर AI लेबल लावलं जात नाही. अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे YouTube ने जारी केलेली मार्गदर्शक तत्वे निवडणुका आणि आणीबाणीच्या काळात महत्त्वाची ठरणार आहेत.
व्हिडीओवर लावण्यात आलेल्या लेबलमुळे संबंधित व्हिडीओ AI चा वापर करून तयार केला आहे की नाही, हे समजेल. AI द्वारे तयार करण्यात आलेल्या व्हिडीओपासून दर्शकांची दिशाभूल होण्यापासून रोखणे, हा या मार्गदर्शक तत्वांचा प्रमुख उल्लेख आहे. यूट्यूबने म्हटले आहे की, मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणारे व्हिडिओ अपलोड केल्यास पर्वा न करता तो प्लॅटफॉर्मवरून काढून टाकला जाईल. मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल निर्मात्यांना 48 तासांचा वेळ मिळेल. यादरम्यान व्हिडिओ हटवावा लागेल किंवा तो ट्रिम किंवा ब्लर करावा लागेल. ही टूल्स फक्त YouTube स्टुडिओमध्ये उपलब्ध असतील. YouTube ची नवीन मार्गदर्शक तत्त्वे येत्या काही महिन्यांत लागू केली जातील.