भारताचे ऑस्ट्रेलियासमोर १७७ धावांचे लक्ष्य(फोटो-सोशल मीडिया)
Australia Women vs India Women, 3rd T20I : भारतीय महिला संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची टी२० मालिका खेळत आहे. अॅडलेडमध्ये खेळल्या जात असलेल्या टी२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ६ विकेट गमावून स्मृति मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्जच्या अर्धशतकांच्या जोरावर १७६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला विजय मिळवण्यासाठी १७७ धावा कराव्या लागणार आहेत.
भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. १९ धावांवर असताना, शेफाली वर्माच्या रूपात संघाला पहिला झटका बसला. शेफाली ७ धावांवर माघारी गेला. त्यानंतर, तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८२ चेंडूत १२१ धावांची भागीदारी रचली.
या खेळीदरम्यान मानधनाने तिचे अर्धशतक झळकवले. ती शतकाच्या दिशेने वाटचाल करत असताना ती ८२ धावांवर बाद झाली. तिच्या ५५ चेंडूंच्या खेळीत मानधनाने ८ चौकार आणि ३ षटकार लगावले. जेमिमा रॉड्रिग्ज ४६ चेंडूत ५९ धावांवर माघारी गेली. यामध्ये ४ चौकार लगावले. यष्टिरक्षक रिचा घोषने ७ चेंडूत १८ धावांची जलद खेळी केली. कर्णधार हरमनप्रीत कौर २ धावांवर नाबाद राहिली. भारतीय संघाने ६ विकेट्सवर १७६ धावा उभ्या केल्या. ऑस्ट्रेलियाकडून अॅनाबेल सदरलँडने २ बळी घेतले, तर किम गार्थ आणि सोफी मोएलिक्सने प्रत्येकी १ बळी टिपला.
ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडू एलिस पेरीसाठी हा सामना विशेष आहे. एलिस पेरीचा हा ३५० वा सामना ठरला असून ती ऑस्ट्रेलियन महिला संघासाठी ३५० सामने खेळणारी पहिलीच खेळाडू बनली आहे. ही कामगिरी करणारी ती जगातील तिसरी महिला क्रिकेटपटू देखील ठरली आहे. पेरीपूर्वी फक्त दोन खेळाडूंनी ही कामगिरी बजावली आहे. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि न्यूझीलंडची सुझी बेट्स यांनी ही कामगिरी केली आहे. एलिस पेरीनंतर, सध्याची एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार एलिसा हीलीने ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक सामने खेळलेले आहेत. हीलीने एकूण २९५ सामने खेळलेले आहेत






