फोटो सौजन्य: सोशल मीडिया
जर तुम्ही फिरायला जाण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला समुद्राची आवड असेल, तुम्हाला समुद्र किनाऱ्यावर फिरायला आवडत असेल तर ही ठिकाण तुमच्यासाठी योग्य आहेत. भारतातील लक्षद्वीप हा समुद्राने वेढलेला बेटांचा समूह आहे, जो पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनही एक अतिशय सुंदर बेट आहे. लक्षद्वीप, भारतातील एक सुंदर बेट समूह, नैसर्गिक सौंदर्य आणि स्वच्छ समुद्रकिनारे यासाठी प्रसिद्ध आहे. जर तुम्ही लक्षद्वीपला जाण्याचा विचार करत असाल तर या खास ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका. या ठिकाणांचे सौंदर्य इतके अतुलनीय आहे की तुम्हाला स्वर्गात असल्यासारखे वाटेल. आजच तुमच्या पर्यटन यादीत या ठिकाणांचा समावेश करा आणि या नैसर्गिक ठिकाणाचा आनंद घ्या.
लक्षद्वीप समुद्रम – लक्षद्वीप समुद्रम हे जलपर्यटन कावरत्ती, कल्पेनी आणि मिनिकॉय बेटांना पाच दिवसांमध्ये भेट देण्याची संधी देते. एमव्ही कावरत्ती जहाजाने या सहलीचे आयोजन केले जाते. यात्रेकरू दिवसाच्या सहलीत बेटांचे सौंदर्य अनुभवतात आणि रात्री जहाजावर विश्रांती घेतात. या सहलीत दुपारचे जेवण आणि नाश्त्याचा समावेश असतो.
आगत्ती बेट – आगत्ती बेटाच्या स्वच्छ आणि निळ्या समुद्राचे सौंदर्य पर्यटकांना खुणावत असते. पांढऱ्या वाळूच्या किनाऱ्यावर वेळ घालवणे आणि स्नॉर्कलिंगचा आनंद घेणे हा एक विस्मयकारक अनुभव आहे. स्कूबा डायव्हिंगद्वारे पाण्याखालील जलचर पाहणे हेदेखील रोमांचक ठरते.
बंगाराम बेट– बंगाराम बेट शांततेसाठी ओळखले जाते. येथे फार कमी लोक येत असल्यामुळे बेटावरचे निसर्गाचे सौंदर्य अबाधित आहे. उगवता आणि मावळता सूर्य पाहणे ही येथील खास आकर्षणे आहेत. या शांत वातावरणात समुद्राच्या किनाऱ्यावर बसून थकवा दूर करण्याचा अनुभव मिळतो
कावरत्ती बेट– लक्षद्वीपची राजधानी असलेले कावरत्ती हे शहर पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. सागरी संग्रहालय आणि विविध जलक्रीडा पर्यटकांचे आकर्षण आहे. इथे पोहणे, वाळूवर खेळणे आणि सागरी संग्रहालयातून समुद्राच्या गोष्टी जाणून घेणे हा अनुभव परदेशी स्थळासारखा वाटतो.
काल्पेनी आणि मिनिकॉय बेट -काल्पेनी बेट जलक्रीडा आणि त्याच्या तलावांसाठी प्रसिद्ध आहे, तर मिनिकॉय बेट त्याच्या दीपगृहासाठी आणि स्वच्छ पाण्यासाठी ओळखले जाते. येथे चालणे आणि पोहणे एक अनोखा अनुभव देतात
लक्षद्वीपच्या या बेटांना भेट देणे म्हणजे तुमच्या जीवनातल्या काही अविस्मरणीय क्षणांची भर टाकणे होय.