सौजन्य: सोशल मीडिया
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि पत्नी नीता अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानी व राधिका मर्चंट लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. राधिका मर्चंट ही एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे. साखरपुडा आणि दोन वेळा प्री- वेडिंगच्या सोहळ्यानंतर जुलै महिन्यात विवाह पार पडणार आहे. देशातील सर्वांत मोठ्या उद्योगपतीच्या मुलाचे लग्न असल्यामुळे लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. तसेच सुरक्षाव्यवस्था देखील चोख असणार आहे. देशातील या बहुचर्चित लग्नाला देशासह विदेशातील पाहुणेदेखील हजेरी लावणार आहेत. लग्नाला काहीच दिवस उरले असल्यामुळे पाहुण्यांना लग्नाची आमंत्रणपत्रिका देण्यात येत आहे. अशातच या आमंत्रणपत्रिकेचा व्हिडीओ समोर आला आहे आणि प्रचंड व्हायरलही झाला आहे.
पूर्वीच्या अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमांतील आमंत्रणाप्रमाणे ही पत्रिका देखील हिंदू देवी-देवतांनी सुशोभित केली आहे. आमंत्रणपत्रिका सोन्या चांदीने जडलेली आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाच्या आमंत्रणाच्या व्हिडिओमध्ये लाल बॉक्स दिसत आहे. पेटी उघडल्यावर एक लहान चांदीचे मंदिर बाहेर सरकते आणि भक्तिसंगीत वाजू लागते. या आमंत्रणपत्रिकेचे उत्कृष्ट असे डिझाईन पत्रिकेला आणखी आकर्षक बनवते. प्रत्येक पानावर गणपती, राधा-कृष्ण, देवी दुर्गा, देवी लक्ष्मी या हिंदू देवता आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे आमंत्रण अनेक भेटवस्तूंसह आलेले आहे. व्हिडिओमध्ये “AR” अशी आद्याक्षरे असलेले नक्षीकाम केलेले कापड, निळी शाल आणि मिठाईचा एक बॉक्स देखील आहे. व्हिडिओमध्ये याचे अनबॉक्सिंग दाखवले आहे.अनंत आणि राधिकाच्या लग्नाचं आमंत्रण ज्यांना जाईल त्यांची नावे पत्रिकेवर चांदीत कोरलेली आहेत.
बॉक्सवर शब्द कोरलेले आहेत: “विथ बेस्ट कॉम्प्लिमेंट्स, नीता आणि मुकेश अंबानी”. दोघांचे लग्न मुंबईत होणार आहे. निमंत्रणाच्या व्हिडिओनुसार, जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये 13 जुलै रोजी “शुभ आशीर्वाद” सोहळा होणार आहे. त्याआधी अंबानी कुटुंबाने दोन प्री-वेडिंग इव्हेंट्सचे आयोजन केले होते. प्रथम जामनगर येथे तीन दिवसांचा बॅश आणि नंतर भूमध्यसागराच्या पलीकडे थांबे असलेली लक्झरी क्रूझ येथे केले होते. त्यानंतर अंबानी कुटुंबातील हा राजेशाही विवाहसोहळा १२ ते १४ जुलै पर्यंत चालणार आहे. १२ जुलैला अनंत आणि राधिका यांचा विवाह थाटामाटात पार पडेल.