Raebareli Government Hospital: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया) Raebareli Government Hospital: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, महिला प्रसूतीच्या वेदनेने तळमळत होती. तिच्या घरच्यांनी तिला घेऊन जिल्हा महिला रुग्णालय गाठलं. तिथे गेल्यावर डॉक्टरांनी तपासण्याऐवजी आधी पैशाची मागणी केली असं नातेवाईकांनी सांगितले. कुटुंब खूप गरीब आहे. 10 हजार रुपये देणं त्यांना शक्यच नव्हतं. त्यांनी कर्मचाऱ्यांना हात जोडले, पण त्यांनी ऐकलं नाही.
महिलेला वारंवार बाहेर पाठवण्यात आलं. दाखल करून घेण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. शेवटी वेदना असह्य झाल्यामुळे महिलेने रुग्णालयाच्या गेटबाहेरच बाळाला जन्म दिला. रस्त्यावरच तिची डिलिव्हरी झाली. आजूबाजूच्या महिलांनी धावत येऊन तिला मदत केली.
🚨SHOCKING | Pregnant woman forced to give birth outside government hospital in Raebareli after hospital staff demanded ₹10K, which her family could not afford https://t.co/CYV0ByGY3p — The Tatva (@thetatvaindia) October 4, 2026
या प्रकरणाने सगळीकडे खळबळ उडाली आहे. मात्र रुग्णालय प्रशासनाने हे सगळे आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. आमच्या हॉस्पिटलमध्ये कोणाकडूनही पैसे घेतले जात नाहीत, सगळं उपचार मोफत आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. रुग्णालयाच्या अधीक्षक निर्मला साहू यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी सांगितलं की, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. जर कोणी कर्मचारी दोषी आढळला तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. सध्या तरी 10 हजार रुपयांची मागणी झाली होती, हा फक्त कुटुंबीयांचा आरोप आहे, हे सिद्ध झालेलं नाही.
Jantar Mantar Protest: पोलीसही झाले अवाक्! आंदोलकांच्या बसची चावी घेऊन महिला पसार, Video Viral
हा काही पहिलाच प्रकार नाही. उत्तर प्रदेशातच नाही तर देशातल्या अनेक सरकारी दवाखान्यांमध्ये असे प्रकार घडत असतात. गरीब लोक सरकारी हॉस्पिटलमध्ये या आशेने जातात की तिथे मोफत उपचार मिळेल. पण तिथेही त्यांना पैशासाठी अडवलं जातं.कधी डॉक्टर वेळेवर नसतात, कधी औषधं बाहेरून आणायला सांगतात.
या महिलेच्या बाबतीत तर थेट रस्त्यावर प्रसूती करायची वेळ आली. ही खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे. योगी सरकार आरोग्य व्यवस्थेवर कोट्यवधी रुपये खर्च करत असल्याचा दावा करतं, पण जमिनीवरची परिस्थिती वेगळीच आहे.
या सगळ्या गोंधळानंतर अखेर महिलेला आणि तिच्या नवजात बाळाला रुग्णालयात दाखल करून घेण्यात आलं आहे. दोघांचीही प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. पण त्या महिलेला जो त्रास सहन करावा लागला, तो कधीच विसरता येणार नाही.
एका आईसाठी प्रसूतीचा क्षण खूप महत्त्वाचा असतो. त्या वेळी तिला चांगल्या सुविधा मिळायला हव्यात, पण इथे तिला रस्त्यावर बाळाला जन्म द्यावा लागला. या घटनेने पुन्हा एकदा सरकारी आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे निघाले आहेत.






