चीनमध्ये हाहाकार! महापुरात शहरंच्या शहरं बुडाली, लाखो लोक बेघर
चीनमधील गुइझोऊ प्रांतात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली असून या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत किमान १४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १७ जण बेपत्ता आहेत. या महापुरामुळे संपूर्ण प्रांतात भू-स्खलन, रस्ते व पूल कोसळण्याच्या घटना घडल्या असून ३,००,००० हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
या पूरस्थितीमुळे अनेक भागातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. नदीकाठच्या आणि डोंगर उतारावरील गावांमध्ये पाणी शिरलं असून अनेक कुटुंबांना मध्यरात्री घर सोडावं लागलं. प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून अनेक ठिकाणी हेलिकॉप्टर्स, ड्रोन आणि रबरी बोटींनी अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या पूरात सर्वात मोठी दुर्घटना वू नदीवर घडली. एक पर्यटकांची बोट उलटून १० जणांचा मृत्यू झाला. हे सर्व पर्यटक पर्यटनासाठी आले होते, मात्र अचानक आलेल्या पुराच्या लाटेत बोट बुडाली. या अपघातात अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. दुसरीकडे, भूस्खलनामुळे चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गुइझोऊमधील रस्ते, पूल आणि उड्डाणपुलांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एका प्रसंगात, एक मालवाहू ट्रक पुलावरून कोसळला. ट्रकचालक पुलाच्या तुटलेल्या टोकाला लटकून वाचण्याचा प्रयत्न करत होता. त्याला शेवटी रेस्क्यू टीमने वाचवले. अशा अनेक अपघातांच्या घटना समोर आल्या आहेत ज्यांनी स्थानिक नागरिकांचे मानसिक संतुलनही ढासळले आहे.
सांडू काउंटीमध्ये १,४४१ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे आणि या भागांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी प्रशासन ड्रोन आणि बोटींवर अवलंबून आहे. स्थानिक प्रशासन, आपत्कालीन विभाग आणि स्वयंसेवी संस्था एकत्रितपणे मदतकार्य करत असून अन्न, पाणी आणि औषधसाहित्य पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
या आपत्तीत स्थानिक उद्योग, शेती, घरे आणि लहान व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार एकूण आर्थिक नुकसान अमेरिकन १ ते २ अब्ज डॉलर्स दरम्यान असू शकते. त्यातील बहुतांश नुकसान हे रस्ते आणि पूल यांच्याशी संबंधित पायाभूत सुविधांचे आहे.
हवामान खात्याने पुढील काही दिवसांत आणखी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क आहे आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे. हवामान बदलामुळे पावसाचे प्रमाण आणि त्याची तीव्रता वाढत असल्याने, यंदाच्या मॉन्सून हंगामातील चीनमधील गुइझोऊ प्रातं सर्वाधिक प्रभावित झाला आहे.