बलाढ्य अमेरिका अन् इस्रायलला एकटा नडला इराण; एकाही देशाची साथ नसताना खामेनेई बनले जगभरातील मुस्लिमांचे हिरो
इराण इस्रायल युद्धात अमेरिकेने भाग घेत, युद्धाची भीषणता वाढवली होती. दोन्ही शक्तीशाली देशांसमोर इराणचा निभाव लागणार नाही, असं मानलं जात होतं. मात्र इराणने इस्रायलसह अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले करत संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का दिला. इराणने हल्ले चढवताच अमेरिकेने युद्धबंदीची घोषणाच करून टाकली, मात्र त्यानंतरही इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. केवळ धर्मनिष्ठा नव्हे, तर धैर्य आणि स्वाभिमानही किती महत्त्वाचा आहे, हे इराणने दाखवून दिलं असून एकाही मुस्लिम देशाने साथ न दिलेल्या मुस्लिमांमध्ये मात्र इराण हिरो बनला आहे.
इस्रायलने गाजामध्ये सुरू केलेल्या निर्दयी हल्ल्यांचा अनेक इस्लामिक देश फक्त निषेध करत राहिले, मात्र इराणने केवळ निषेध न करता थेट कृती केली आणि अखेर इस्रायल आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य देशांनाही सीजफायरसाठी मान झुकवायला लावली.
इराणने मंगळवारी अमेरिकेच्या मीडल ईस्टमधील सर्वात मोठ्या लष्करी तळावर क्षेपणास्त्रांचा हल्ला केला. त्यानंतर लगेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी, इस्रायल आणि इराण युद्धात दोन्ही देश युद्धबंदी करत असल्याची घोषणा केली. हा हल्ला प्रतिकात्मक असला, तरी त्यामधून इराणने धमक्यांपासून आम्ही घाबरत नाही असा स्पष्ट संदेश ट्रंप आणि नेतन्याहू यांना दिला.
इराणचे ८६ वर्षांचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येचा धोका असूनही त्यांनी पाठ न दाखवता देशाच्या सन्मानासाठी झुकणं नाकारलं. इराणी लोक फिलिस्तीनसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढतील, अशी भूमिका घेतली. या भूमिकेने खामेनेईंना जगभरातील मुस्लिम समाजामध्ये नायक बनवलंय.
सौदी अरेबिया, तुर्की यांसारख्या देशांनी गाजाच्या युद्धाबाबत केवळ निंदा केली. पण प्रत्यक्ष कृतीत मात्र ते कमी पडले. याउलट शिया देश असलेल्या इराणने सुन्नी बहुल फिलिस्तीनसाठी इजिप्तपासून गाझापर्यंत हिजबुल्लाह, हूतीसारख्या प्रॉक्सी गटांना मदत करत इस्रायलला वेठीस धरलं. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, हमासलाही इराणकडून लष्करी आणि आर्थिक मदत मिळत असते.
इराणने केवळ लष्करी स्तरावरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही फिलिस्तीनचा मुद्दा वारंवार उपस्थित केला. यामुळे अमेरिका आणि इस्रायलच्या डोळ्यांत इराण खुपायला लागलं. परिणामी, इस्रायली गुप्तहेर संस्थांनी इराणमधील वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांच्या हत्या घडवून आणल्या. पण तरीही इराणने आपली भूमिका बदलली नाही.
१३ जून रोजी इस्रायलने इराणवर थेट हल्ला चढवून त्याचे अनेक लष्करी आणि अणुऊर्जा केंद्रे नष्ट केली. यामध्ये सुमारे ३० वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि अधिकारी मारले गेले. या हल्ल्यांनंतर पुढील १० दिवस इराण आणि इस्रायल यांच्यात सातत्याने हवाई हल्ले झाले. इराणमध्ये ६०० हून अधिक नागरिक मृत्युमुखी पडले, तर इस्रायलमध्येही ३० हून अधिक जण ठार झाले.
२१ जून रोजी अमेरिकेच्या बी-२ बॉम्बर्सनी इराणच्या नतांज, फोर्डो आणि इस्फहान येथील तीन अणुसंस्थांवर हल्ला केला. ट्रंप यांनी थेट धमकी दिली की, खामेनेई कुठे आहेत याची आम्हाला माहिती आहे आणि इराणने शरणागती पत्करावी. पण खामेनेईंनी जाहीर केलं – “माझ्या जीवाला काही किंमत नाही, पण इराण आणि इस्लामिक गणराज्याचं भविष्य महत्त्वाचं आहे.” त्यांनी आपल्या उत्तराधिकारीचीही निवड केली आणि देशवासीयांना एकजूट राहण्याचं आवाहन केलं.
Iran-Israel War : खेळ अजून संपलेला नाही! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणमध्ये घडतायेत मोठ्या घडामोडी
मंगळवारी पहाटे इराणने कतरमधील अल-उदीद अमेरिकन एअरबेसवर १० क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्याने अमेरिकेलाही जाणवलं की, इराण केवळ धमकी देत नाही, तर कृतीही करू शकतो. परिणामी, अमेरिका आणि इस्रायलला अखेर युद्धबंदी स्वीकारावी लागली.या संपूर्ण संघर्षात इराणने जे धैर्य दाखवलं, त्याने खामेनेई हे केवळ शिया नव्हे तर सुन्नी मुस्लीमांमध्येही नायक बनले. सगळं जग मौन बाळगून होतं, तेव्हा इराणने कृती केली आणि दाखवून दिलं – मुस्लीम जगतात स्वाभिमान टिकवण्यासाठी कोणीतरी उभं राहत असेल, तर तो इराण आहे.