Armenian Prime Minister visit Turkey : दशकांनंतर प्रथमच आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिन्यान यांनी त्यांच्या पारंपरिक शत्रू तुर्कीचा ऐतिहासिक दौरा केला असून, या घटनेमुळे संपूर्ण कॉकस आणि पश्चिम आशियामध्ये खळबळ उडाली आहे. तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांच्या निमंत्रणावरून झालेल्या या भेटीचे वर्णन “प्रादेशिक शांततेकडे टाकलेले निर्णायक पाऊल” असे करण्यात येत आहे. मात्र, या दौऱ्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे.
या भेटीदरम्यान अंकारातील डोल्माबाहचे पॅलेस येथे दोन्ही नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. ही भेट महत्त्वाची ठरते कारण 1993 पासून तुर्की आणि आर्मेनियामधील सीमारेषा बंद आहे आणि या दोन देशांमध्ये कधीच औपचारिक राजनैतिक संबंध प्रस्थापित झालेले नाहीत. आर्मेनियन पंतप्रधानांची तुर्कीतील ही शीतयुद्धानंतरची पहिली भेट आहे.
ऐतिहासिक शत्रुत्वाच्या पार्श्वभूमीवर संवाद
पहिल्या महायुद्धाच्या काळात ओटोमन साम्राज्याच्या अंतर्गत लाखो आर्मेनियन नागरिकांचे निर्घृण हत्याकांड घडल्याचा आरोप आर्मेनिया करतो, तर तुर्की हा आरोप फेटाळतो. त्याचबरोबर, तुर्की अझरबैजानला उघडपणे पाठिंबा देतो, जे आर्मेनियासाठी गंभीर धोका ठरतो. नागोर्नो-काराबाख युद्धात तुर्कीने अझरबैजानला बायरक्तार TB2 ड्रोन आणि अन्य आधुनिक शस्त्रास्त्रे पुरवली होती, ज्यामुळे आर्मेनियन सैन्याला मोठा फटका बसला होता.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel- Iran War: इराण इस्त्रायल युद्ध पार्श्ववभूमीवर ‘हा’ अनोख्या मिसाइलचा VIDEO सोशल मीडियावर का होतोय इतका VIRAL??
भारताच्या मैत्रीचा प्रभाव
या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारताचे नावही प्रकर्षाने पुढे येते. आर्मेनियाने नुकतेच भारताकडून पिनाका मल्टिपल रॉकेट लाँचर, आकाश हवाई संरक्षण प्रणाली यांसारखी घातक शस्त्रे खरेदी केली आहेत. भारत आणि आर्मेनिया यांच्यातील संरक्षण सहकार्यामुळे आर्मेनियाची सामरिक स्थिती मजबूत झाली आहे. त्यामुळे, आर्मेनियाचा तुर्कीशी संवाद साधण्याचा प्रयत्न भारताच्या माध्यमातून प्रादेशिक संतुलन साधण्याचा भाग असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
तुर्कीचे उद्दिष्ट – शांतता की प्रभाव विस्तार?
पंतप्रधान निकोल यांनी भेटीदरम्यान चर्च आणि ब्लू मशिदीला भेट देत तुर्कीतील आर्मेनियन समाजाशी संवाद साधला. आर्मेनियाच्या संसद सभापती अॅलेन सिमोन्यान यांनी ही भेट “ऐतिहासिक” ठरवत सांगितले की, “अझरबैजानसोबतचा संघर्ष टाळण्यासाठी आणि संवादाच्या माध्यमातून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान प्रयत्नशील आहेत.” या भेटीच्या एक दिवस आधी अझरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम अलीयेव देखील तुर्कीला पोहोचले होते आणि त्यांनीही एर्दोगान यांच्याशी चर्चा केली. एर्दोगान यांनी या दोन्ही शिष्टमंडळांशी चर्चा करताना स्पष्ट केले की, “आम्ही प्रादेशिक शांततेसाठी प्रयत्नशील आहोत.”
अझरबैजानमध्ये चिंता
या घडामोडींमुळे अझरबैजानमध्ये चिंता वाढली आहे. भारताकडून आर्मेनियाकडे आलेली शस्त्रे आणि आता तुर्कीशी वाढता संवाद यामुळे अझरबैजानच्या रणनीतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आर्मेनिया जर तुर्कीशी संबंध सुधारण्यात यशस्वी झाला, तर तुर्की-अझरबैजान युतीला धक्का बसू शकतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel- Iran War: इराण खेळतोय आता अंतर्गत चाल; पण कोणाचा काढणार काटा?
भारत, तुर्की आणि अझरबैजान
पंतप्रधान पशिन्यान यांची ही तुर्की भेट इतिहासाच्या संदर्भात एक मोठे पाऊल आहे. भारत, तुर्की आणि अझरबैजान या तिघांच्या नाजूक संतुलनात बदल होऊ शकतो, आणि भविष्यात पश्चिम आशियात नवीन सामरिक गठबंधन निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे तुर्की ‘खलिफा’च्या स्वप्नांत रमलेला असताना, आर्मेनिया भारताच्या सहकार्याने स्वतःचे अस्तित्व वाचवण्यासाठी डावपेच आखतो आहे. हे नवे समीकरण प्रादेशिक राजकारणाचे भविष्य ठरवणारे ठरू शकते.