Mahabaleshwar Strawberry GI Tag Misuse ( महाबळेश्वर स्ट्रॉबेरी GI टॅगचा गैरवापर )
श्रीराम फुट प्रोसेसिंग सहकारी संस्था ही सहकार कायद्यानुसार सहाय्यक निबंधक, महाबळेश्वर यांचेकडे नोंदणीकृत असून गेल्या सुमारे ३५ वर्षांपासून कार्यरत आहे. महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला आणि कृषी उत्पादनाला चांगला दर मिळावा तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावे, यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. पर्यटन तालुका असलेल्या महाबळेश्वरमध्ये सातारा जिल्ह्यासह संपूर्ण देशभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येतात. येथे स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते; पर्यटकांना आणि असंख्य ग्राहकांना उत्तम दर्जाची स्ट्रॉबेरी मिळावी यासाठी संस्था स्थानिक स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन, तसेच तांत्रिक व आर्थिक सहाय्य करते.
महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी संस्थेने भारत सरकारच्या भौगोलिक उपदर्शन रजिस्ट्रीकडे नोंदणी करून “महाबळेश्वर स्ट्रॉबेरी” या नावाने भौगोलिक उपदर्शन (G.I.-154) प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. मात्र, सध्या महाबळेश्वर तालुक्याबाहेर उत्पादित होणारी स्ट्रॉबेरी ‘महाबळेश्वर स्ट्रॉबेरी’ या नावाने छपाई, पॅकिंग व जाहिरात करून विकली जात असल्याचे संस्थेच्या निदर्शनास आले आहे.
ही बाब अनुचित व्यापार पद्धती असून पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे असंख्य ग्राहकांची फसवणूक होत असून महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांचे आणि संस्थेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे व होत आहे.
ही नोटीस प्राप्त झाल्यापासून महाबळेश्वर तालुक्याबाहेर उत्पादित होणाऱ्या स्ट्रॉबेरीची ‘महाबळेश्वर स्ट्रॉबेरी’ या नावाने वृत्तपत्रे, समाजमाध्यमे किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून दिशाभूल करणारी जाहिरात, छपाई अथवा पॅकिंग करून विक्री करू नये, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
याचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्ती किंवा घटकाविरुद्ध दिवाणी व फौजदारी कायद्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल आणि त्यामुळे होणाऱ्या नुकसानीस व परिणामास सर्वस्वी संबंधित घटकच जबाबदार राहील, असे नोटीसमध्ये बजावण्यात आले आहे. तसेच या नोटीसचा रु. १०,०००/- खर्च संबंधित व्यक्तीवर ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, या विषयावर स्ट्रॉबेरी ग्रोव्हर असोसिएशनचे अध्यक्ष नितीन भिलारे यांनी आपली सविस्तर भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली स्ट्रॉबेरी कोणत्याही भौगोलिक क्षेत्रातील असली तरी ती विक्री करण्यासंदर्भात आमचे कोणतेही दुमत नाही.
स्ट्रॉबेरीचे उत्पादन करून तिची विक्री करणे हा प्रत्येक शेतकऱ्याचा अधिकार आहे; मात्र ज्या भागात जी स्ट्रॉबेरी पिकवली जाते, त्याच भागातील ती संबंधित स्ट्रॉबेरी आहे, असे सांगूनच तिची विक्री होणे अपेक्षित आहे. महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी महाबळेश्वरच्या नावाने विकली जावी आणि ‘महाबळेश्वर’ हा भौगोलिक उपदर्शन (GI) टॅग त्यासाठी वापरण्यात यावा.
वाई, जावळी किंवा इतर कोणत्याही भागातील स्ट्रॉबेरी विकली जात असेल, तर ती त्या संबंधित भागातील किंवा गावातील आहे, असे स्पष्ट सांगूनच तिची विक्री व्हावी; ‘महाबळेश्वर स्ट्रॉबेरी’ या नावाने नव्हे. कारण प्रत्येक मातीत उगवणाऱ्या स्ट्रॉबेरीचे गुणधर्म आणि तिची चव वेगवेगळी असते.
त्यामुळे स्ट्रॉबेरी ज्या भौगोलिक क्षेत्रात पिकवली जाते, त्याच भौगोलिक क्षेत्राचे किंवा गावाचे नाव देऊन ती विकावी, जेणेकरून ग्राहकांची फसवणूक होणार नाही. याकडे संबंधितांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहनही नितीन भिलारे यांनी केले.






