बेलीझ सिटी : मध्य अमेरिकेतील छोट्या शांत देशात घडलेली एक धक्कादायक घटना सध्या संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेत आहे. बेलीझमध्ये एका लहान प्रवासी विमानाचे अपहरण एका अमेरिकन व्यक्तीने केले, जो माजी सैनिक असल्याचे सांगितले जाते. या धक्कादायक घटनेमध्ये तीन लोक गंभीर जखमी झाले असून, अपहरणकर्त्याचा मृत्यू झाला आहे.
ही घटना गुरुवारी सकाळी घडली. ‘ट्रॉपिक एअर’ या स्थानिक विमान कंपनीचे लहान प्रवासी विमान कोरोझल शहरातून सॅन पेड्रो या पर्यटनस्थळी जात होते. विमानात १४ प्रवासी आणि २ क्रू मेंबर्स होते. प्रवास सुरळीत सुरू असताना अचानक एका प्रवाशाने चाकू काढून इतर प्रवाशांवर आणि पायलटवर हल्ला चढवला. या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाले.
अपहरणकर्त्याची ओळख
अपहरणकर्त्याची ओळख अकिनिएला टेलर अशी पटली आहे. बेलीझचे पोलिस आयुक्त चेस्टर विल्यम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, टेलर हा अमेरिकेचा माजी सैनिक असल्याचा दावा केला जात आहे, मात्र याबाबत अद्याप अमेरिकन अधिकाऱ्यांकडून अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. घटनेदरम्यान, जखमी झालेल्या एका प्रवाशाकडे बंदुकीचा वैध परवाना होता. अत्यंत धोक्याच्या आणि भयावह प्रसंगी या प्रवाशाने संयम राखून अपहरणकर्त्यावर गोळी झाडली. त्यात टेलर जागीच ठार झाला. त्यानंतर या प्रवाशाने स्वतःची बंदूक पोलिसांकडे सुपूर्त केली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Shooting: फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीत गोळीबाराची भीषण घटना; दोघांचा मृत्यू, पाच जण जखमी, कॅम्पस लॉकडाऊन
विशेष म्हणजे विमान तब्बल दोन तास आकाशात घिरट्या घालत होते. या कालावधीत अपहरणकर्त्याशी झुंज सुरू होती. बेलीझच्या लेडीव्हिल शहरात असलेल्या विमानतळावर शेवटी विमान सुरक्षितरित्या उतरवण्यात आले. यावेळी पोलिसांच्या हेलिकॉप्टरद्वारे पाठलागही सुरू होता. बेलीझ विमानतळ कन्सेशन कंपनीच्या निवेदनानुसार, सकाळी ८:३० वाजता पूर्ण आणीबाणीची घोषणा करण्यात आली होती. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली.
ट्रॉपिक एअरचे सीईओ मॅक्सिमिलियन ग्रेफ यांनी या प्रसंगावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “इतक्या भीषण दबावाखालीही आमच्या वैमानिकांनी अपूर्व धैर्य दाखवले. त्यांच्या शांत संयमामुळेच विमान सुखरूप उतरले.” सध्या चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या दोन प्रवाशांवर आणि पायलटवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी एका प्रवाशाच्या फुप्फुसाला गंभीर इजा झाली असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी वॉशिंग्टनमध्ये सांगितले की, “घटनेबाबत अधिक माहिती गोळा केली जात आहे. आम्ही बेलीझमधील अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहोत.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : चीन तैवानच्या जीवावरच उठला; तैवान आणि जपान दरम्यान 6 अणु पाणबुड्यांची तैनाती
शौर्य, संयम आणि तत्परतेचे उदाहरण
या घटनेमधून केवळ धाडस नव्हे तर आपत्कालीन परिस्थितीत संयम, प्रशिक्षण आणि सजगतेचे महत्त्व अधोरेखित होते. जर त्या प्रवाशाकडे शस्त्र नसते, तर ही घटना मोठी शोकांतिका ठरली असती. बेलीझमध्ये आता या घटनेची सखोल चौकशी सुरू झाली आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही सुरक्षा यंत्रणांची जागरूकता वाढण्याची शक्यता आहे. हा प्रकार हा केवळ एका देशाच्या सुरक्षेचा नव्हे, तर संपूर्ण वैमानिक सुरक्षेच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा क्षण आहे. यामुळे भविष्यात विमानात सुरक्षा उपाययोजनांमध्ये अधिक काटेकोर बदल अपेक्षित आहेत.