शिंदे गटाच्या मंत्र्याची शरद पवारांच्या आमदाराला थेट ऑफर (Photo - Social Media)
पंढरपूर : राज्याच्या राजकारणात सध्या आणखी एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या एका बड्या नेत्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदाराला मोठी ऑफर दिली आहे. ‘आमच्यात या, थेट मंत्रिपद देतो’ असं विधान केल्याने आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आधीच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेचा मुद्दा गरम असताना तसेच डिलिमिटेशवरुन शरद पवार गटात सुरु असलेल्या घडामोडीवरून शिवसेनेकडून करण्यात आलेल्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. (Maharashtra Politics)
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी थेट शरद पवार गटाच्या आमदारालाच आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. एवढंच नाही तर शिवसेनेत प्रवेश केल्यास मंत्रीपदही देऊ, असं जाहीर आश्वासन त्यांनी दिलं आहे. माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांना उद्देशून त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
आमदार अभिजीत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढा मतदारसंघातील आमदार आहेत. त्याचबरोबर ते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमनही आहेत. अशा परिस्थितीत त्यांना थेट शिवसेनेत येण्याचं निमंत्रण मिळाल्याने या वक्तव्याकडे विशेष लक्ष दिलं जात आहे. मंत्री भरत गोगावले कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात दाखल झाले आहेत. याच वेळी त्यांनी अभिजीत पाटील यांच्याबाबत हे विधान केलं.
भरत गोगावले म्हणाले की, आपण संकटात असतो तेव्हा देव आपल्या मदतीला उभा राहतो. मात्र देवच अडचणीत असताना अभिजीत पाटील यांचे वंशज उभे राहिले, असं म्हणत त्यांनी अभिजीत पाटील यांचे आभार मानले.
यावेळी त्यांनी थेट ऑफर देताना, ‘आमच्याकडे येण्याचं झालं तर मंत्रीपदही देऊ शकतो,’ असं उपस्थित जनसमुदायासमोर सांगितलं.
त्यांच्या या वक्तव्यामुळे अभिजीत पाटील शिंदे गटात जाणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र अभिजीत पाटील यांनी या ऑफरवर अद्याप काय प्रतिक्रिया दिली आहे, हे स्पष्ट झालेलं नाही.
दरम्यान, कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली आहे. विठ्ठलनामाच्या गजरात संपूर्ण पंढरपूर भक्तिमय झालं आहे.
या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक शासकीय महापूजा होणार आहे. या सोहळ्यासाठी शिवसेनेसह विविध राजकीय पक्षांचे नेते पंढरपुरात दाखल झाले आहेत. मात्र या धार्मिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भरत गोगावले यांनी दिलेली राजकीय ऑफर सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
Ans: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांना भरत गोगावले यांनी शिवसेनेत येण्याची ऑफर दिली.
Ans: अभिजीत पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांना मंत्रीपदही देऊ शकतो, असं भरत गोगावले यांनी जाहीरपणे म्हटलं.
Ans: कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात दाखल झाल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं.






