नवी दिल्ली – श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांनी अमेरिकेत स्थायिक होण्याकरीता ग्रीन कार्डसाठी अर्ज केला आहे. गेल्या महिन्यात श्रीलंकेतील लोकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारविरोधी निदर्शने केली होती. त्यामुळे ते देश सोडून पळून गेले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची पत्नी आणि मुलगा आधीच अमेरिकेत स्थायिक झाले आहेत.
श्रीलंकन वृत्तपत्र डेली मिररने सूत्रांच्या हवाल्याने दावा केला आहे की, राजपक्षे यांच्या अमेरिकेतील वकिलांनी गेल्या महिन्यातच त्यांना ग्रीन कार्ड मिळण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यांच्या पत्नी लोमा राजपक्षे या आधीच अमेरिकन नागरिक आहेत. त्यामुळे ते ग्रीन कार्डसाठी अर्ज करू शकतात. गोताबाया यांच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व देखील होते. परंतु २०१९ मध्ये श्रीलंकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत भाग घेण्यासाठी त्यांनी अमेरिकन नागरिकत्वाचा त्याग केला.
राजपक्षे सध्या त्यांच्या पत्नीसह बँकॉकमधील एका हॉटेलमध्ये आहेत. पूर्वी ते नोव्हेंबरपर्यंत थायलंडमध्ये राहणार होते. पण आता त्याने आपला प्लॅन रद्द केला आहे. २५ ऑगस्टला तो श्रीलंकेला परतणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना थायलंडमध्ये मुक्तपणे राहण्याची परवानगी दिली जात नाही. येथे पोलिसांनी त्यांना हॉटेलच्या बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.






