पाकिस्तानच्या कराचीत ‘हॅलोवीन रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा; 200 पेक्षा अधिक शाळकरी विद्यार्थी आढळले नशेत धुंद

पाकिस्तानातील कराचीमध्ये सुरु असलेल्या 'हॅलोवीन रेव्ह पार्टी'वर (Halloween Rave Party) पोलिसांनी छापेमारीची कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत पार्टी करताना पोलिसांनी बंगल्यावर छापा टाकून 200 पेक्षा अधिक शाळकरी विद्यार्थ्यांना पकडले. हे सर्व विद्यार्थी नशेत धुंद होते.

    कराची : पाकिस्तानातील कराचीमध्ये सुरु असलेल्या ‘हॅलोवीन रेव्ह पार्टी’वर (Halloween Rave Party) पोलिसांनी छापेमारीची कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत पार्टी करताना पोलिसांनी बंगल्यावर छापा टाकून 200 पेक्षा अधिक शाळकरी विद्यार्थ्यांना पकडले. हे सर्व विद्यार्थी नशेत धुंद होते. हे विद्यार्थी कराचीच्या ग्रामर स्कूलमधील असल्याची माहिती दिली जात आहे.

    कराची ग्रामर स्कूलमधील या विद्यार्थ्यांसाठी बंगल्यात बेकायदेशीरपणे पार्टी आयोजित करण्यात आली होती. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी या ठिकाणी छापा टाकला. यावेळी अनेक अल्पवयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी नशेत धुंद असल्याचे पाहिला मिळाले. या छापेमारीच्या कारवाईचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. छापा टाकला तेव्हा अनेक दारूच्या बाटल्या व्हिडिओत दिसत होत्या. दरम्यान, या छापेमारीचा व्हिडिओ जारी केल्याने स्थानिक कोर्टाने नाराजी व्यक्त करत पोलिसांना चांगलंच फटकारल्याचे वृत्त आहे.

    पहाटे चारपर्यंत सुरु होती पार्टी

    रात्री अकराच्या सुमारास सुरू झालेली पार्टी रात्री उशिरापर्यंत चालली. पोलिसांनी पहाटे 4 च्या सुमारास त्या ठिकाणी छापा टाकला. पण या छापेमारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पार्टीतील विद्यार्थी अल्पवयीन असल्याने त्यांची ओळख उघड होऊ नये, असे म्हणणे होते.

    पार्टीसाठी पोलिसांची परवानगी?

    या पार्टीसंदर्भात विद्यार्थ्यांनी पोलिस ठाण्यात पत्र सादर करून पार्टीसाठी पोलिसांची परवानगी मागितली होती. मात्र, विद्यार्थ्यांनी शाळेच्या लेटरहेडचा वापर केला की अन्य कागदपत्रे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी काही अल्पवयीन मुलींसह सुमारे दहा विद्यार्थ्यांना अटक केल्याचे सांगितले जात आहे.