संग्रहित फोटो
इस्लामाबाद : पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये सलग तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले असून, अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. परिस्थिती इतकी भीषण आहे की, सरकारने बलुचिस्तानमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. या पावसामुळे देशातील विविध भागात आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी खैबर पख्तूनख्वामध्ये सोमवारी 12 जणांचा मृत्यू झाला.
याशिवाय पंजाबमध्ये 4 आणि बलुचिस्तानमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. बलुचिस्तानच्या मकरानमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि अनेक ठिकाणी वीज पडली. या घटनांमध्ये आणखी दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे बलुचिस्तानमधील मृतांची संख्या 10 झाली आहे. बलुचिस्तान सरकारने शहरी पूर आणीबाणी घोषित केली आहे. या पावसामुळे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्येही परिस्थिती बिकट झाली आहे.
अफगाणिस्तानातही 33 जणांचा मृत्यू
अफगाणिस्तानातही अतिवृष्टीमुळे 33 जणांचा मृत्यू झाला असून, 27 जण जखमी झाले आहेत. तालिबान शासित अफगाणिस्तानात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरेही कोसळली आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमध्ये सुमारे 600 घरे जमीनदोस्त झाली आहेत, तर 200 जनावरेही ठार झाली आहेत. या पुरामुळे शेतीयोग्य जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, रस्त्यांचेही नुकसान झाले आहे.