पाकिस्तानच्या बलुचिस्तानात मोठा बॉम्बस्फोट; क्वेटा येथे जाणाऱ्या रेल्वेला केलं लक्ष्य, प्रवाशांमध्ये भीती
इस्लामाबाद : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक घडामोडी घडत आहेत. काही देशांत दहशतवादी कारवायाही सुरु आहेत. असे असताना आता पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा एका रेल्वेला लक्ष्य करत हल्ला केला. क्वेटाला जाणाऱ्या रेल्वेत मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती सध्या दिली जात आहे.
बलुचिस्तानात झालेला हा काही पहिला हल्ला नाही. यापूर्वी मार्च महिन्यात अशाप्रकारचा हल्ला झाला होता. त्यानंतर रेल्वेवर झालेला हा तिसरा हल्ला आहे. यातील दहशतवाद्यांनी सिबी जिल्ह्यातील बख्तियाराबाद आणि दंबोली दरम्यान स्फोटकांनी रेल्वे ट्रॅक उडवला. कराची आणि क्वेटा दरम्यान धावणाऱ्या बोलन मेल ट्रेनमध्ये झालेल्या स्फोटामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला. अधिकाऱ्यांनी ही घटना दहशतवादी हल्ला अशी म्हटली आहे. अचानक झालेल्या या स्फोटामुळे रेल्वेच्या डब्याचे काही नुकसान झाले.
हेदेखील वाचा : Italy Plane Crash Video: रस्त्यांवरील गाड्यांवरच कोसळले विमान; क्षणार्धात आग अन्…, इटलीत घडला भीषण अपघात
या घटनेनंतर, प्रभावित भागातील रेल्वे वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती. सुरक्षा दलांनी घटनास्थळी पोहोचून सीलही केले आहे, तर रेल्वे तांत्रिक पथकही तपासासाठी घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, ट्रॅक मोकळा होऊन सुरक्षेची खात्री झाल्यानंतरच रेल्वे सेवा पूर्ववत केली जाईल, रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अनेक रेल्वेसेवांना फटका
या घटनेनंतर, पंजाबहून धावणारी जाफर एक्सप्रेस डेरा मुराद जमाली स्टेशनवर थांबवण्यात आली आहे. क्वेटाजवळील सिबी स्टेशनवर थांबवण्यात आली होती. मार्चमध्ये जाफर एक्सप्रेसचे अपहरण करण्यात आले होते. मार्चमध्येही असाच एक प्रकार उघडकीस आला होता, जेव्हा बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या बीएलएशी संबंधित दहशतवाद्यांनी जाफर एक्सप्रेस ट्रेनचे अपहरण केले होते. ही ट्रेन क्वेटाहून पेशावरला जात होती.