लंडन : युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपमध्ये तणाव अधिकच वाढताना दिसत आहे. ब्रिटन आणि रशिया यांच्यातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे, कारण ब्रिटनमधील अणु प्रकल्पाजवळ पाण्याखाली एक स्पाय कॅमेरा सापडल्याने खळबळ उडाली आहे. हा कॅमेरा रशियाचा असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, ब्रिटिश अधिकाऱ्यांनी याला रशियन गुप्तचर यंत्रणेचा नवा डाव मानले आहे.
हा कॅमेरा अशा वेळी सापडला आहे, जेव्हा ब्रिटनने रशियाच्या आक्रमक भूमिकेविरोधात उघडपणे आघाडी घेतली आहे. अमेरिकेने युक्रेनला मदतीपासून मागे हटल्याने, ब्रिटन आणि फ्रान्सने युरोपियन युनियनच्या विशेष बैठकीत रशियाच्या विरोधात कडव्या भूमिका स्वीकारण्याचा संकल्प केला. या पार्श्वभूमीवर, ब्रिटनच्या महत्त्वाच्या आण्विक पाणबुड्यांवर नजर ठेवण्यासाठी रशियाने ही हेरगिरी सुरू केल्याचा आरोप केला जात आहे.
ब्रिटनच्या अणु प्रकल्पाजवळ सापडला स्पाय कॅमेरा
ब्रिटीश वृत्तपत्र टेलिग्राफ च्या अहवालानुसार, ब्रिटनच्या अणु प्रकल्पाजवळ संशयास्पद स्पाय कॅमेरा सापडला, जो पाण्याच्या वर आणि खाली दोन्ही ठिकाणी बसवण्यात आला होता. ब्रिटिश लष्कराने या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला असून, हा कॅमेरा कसा बसवला गेला आणि नेमका कोणी बसवला? याचा शोध घेतला जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताच्या उपकाराचीही उपेक्षा; ड्रॅगनसोबतची मैत्री ही जणू विषाचीच परीक्षा
तज्ज्ञांच्या मते, हा कॅमेरा ब्रिटनच्या आण्विक पाणबुड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी वापरण्यात येत होता. ब्रिटनकडे असलेल्या व्हॅन्गार्ड श्रेणीतील आण्विक पाणबुड्या जगातील अत्यंत घातक शस्त्रांपैकी एक मानल्या जातात. त्यामुळे रशियाने या पाणबुड्यांबाबत माहिती गोळा करण्यासाठी हा कॅमेरा लावला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
रशियाने समुद्रातून गुप्त हेरगिरी सुरू केली?
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि त्यांची गुप्तचर यंत्रणा हेरगिरीत पारंगत मानली जाते. युक्रेन युद्धाच्या दरम्यान रशियाने नवनवीन हेरगिरीच्या पद्धती विकसित केल्या आहेत, आणि युरोपमध्ये या संदर्भात मोठी घबराट पसरली आहे.
अलीकडेच नॉर्वेजवळ एक रशियन पाणबुडी दिसली. विशेष म्हणजे, ही पाणबुडी समुद्राखाली असलेल्या केबल वायर कापण्याचे काम करते, असा ब्रिटिश अधिकाऱ्यांचा दावा आहे. ब्रिटनच्या अधिकाऱ्यांना भीती आहे की, हीच पाणबुडी पाण्यात पाळत ठेवणारे हेरगिरी कॅमेरे बसवत आहे, जे भविष्यात अधिक धोकादायक ठरू शकते.
ब्रिटन आणि रशियातील वाढता तणाव
ब्रिटनने रशियाच्या विरोधात उघड भूमिका घेतल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव अधिकच वाढला आहे. ब्रिटन आणि फ्रान्सने युरोपियन युनियनच्या विशेष बैठकीत रशियाविरोधात एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. यानंतर रशियाने अटलांटिक आणि बाल्टिक समुद्र भागात आपली उपस्थिती वाढवली, आणि संभाव्य गुप्त मिशन सुरू केली आहेत. रशियाविरुद्ध उघड आघाडी घेणे ब्रिटनला कितपत महागात पडेल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल, पण रशियन गुप्तचर यंत्रणेच्या या हेरगिरीमुळे ब्रिटन आणि संपूर्ण युरोप अधिक सतर्क झाला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Travis Scott Concert India: ट्रॅव्हिस स्कॉटच्या शोसाठी बुकिंग सुरू, जाणून घ्या भारतात कधी होणार कॉन्सर्ट
ब्रिटनच्या आण्विक पाणबुड्यांवर नजर
रशिया आणि ब्रिटन यांच्यातील हा नवीन वाद जागतिक राजकारणावर मोठा परिणाम करू शकतो. ब्रिटनच्या आण्विक पाणबुड्यांवर नजर ठेवण्यासाठी रशियन स्पाय कॅमेरा वापरण्यात आल्याचा संशय ब्रिटिश अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे युरोपमध्ये अस्थिरता वाढण्याची शक्यता असून, ब्रिटन यावर कोणती पावले उचलतो हे महत्त्वाचे ठरेल. रशियाने यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली तरी, युरोपियन देश आता अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.