आता महिलांना सार्वजनिक ठिकाणी बोलण्यास, तोंड दाखवण्यास बंदी; पर-पुरुषाकडे बघितले तरी..., तालिबानचा नवा कायदा
तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबीज केल्यानंतर महिलाविरोधी वृत्ती दाखवण्यास सुरुवात केली होती. गेल्या काही महिन्यांमध्ये तालिबानने महिलांवर अनेक निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने महिलांसाठी नवे कायदे लादले आहेत. अफगाणिस्तानमध्ये तालिबानने महिलांसाठी नवे कायदे केले आहेत. या कायद्यांतर्गत महिलांना सार्वजनिक ठिकाणी बोलण्यास आणि तोंड दाखवण्यास बंदी घालण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रांनी या निर्बंधांचा निषेध केला आहे. तसेच पर पुरुषाकडे बघितले तरी दंड होऊ शकतो.
तालिबानचा सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदजादा यांनी नवीन कायद्यांना मंजुरी दिली आहे. तालिबानने या कायद्यांची ‘चांगली’ आणि ‘वाईट’ या दोन श्रेणींमध्ये विभागणी केली आहे. त्यात म्हटले आहे की, महिलांनी सार्वजनिक ठिकाणी नेहमी जाड कपड्यांनी आपले शरीर आणि चेहरा पूर्णपणे झाकून ठेवावा जेणेकरुन पुरुषांच्या वाईट नजरेपासून तुमचा बचाव होऊ शकतो. एका वृत्तानुसार, या कायद्यांमध्ये असे म्हटले आहे की, महिलांचा आवाजही पुरुषांचे लक्ष विचलित करू शकतो. त्यामुळे महिलांना सार्वजनिक ठिकाणी बोलू दिले जाणार नाही. याशिवाय महिलांना घरात मोठ्या आवाजात गाणे म्हणं किंवा पुस्तकाचे वाचन करण्यासही देखील मनाई करण्यात आली.
नवीन कायद्यांनुसार, जेव्हा जेव्हा एखादी प्रौढ महिला गरज भासल्यास घराबाहेर पडते तेव्हा तिला तिचा आवाज, शरीर आणि चेहरा लपवणे बंधनकारक असेल. याशिवाय अफगाण स्त्रिया ज्या पुरुषांशी त्यांचे नाते किंवा वैवाहिक संबंध नाहीत अशा पुरुषांना प्रत्यक्ष पाहता येत नाही. तसेच एखाद्या टॅक्सी चालकाने एकट्या महिलेला टॅक्सीमध्ये नेले तरी त्याला शिक्षा होऊ शकते. अफगाणिस्तानमध्ये तालिबानने महिलांसाठी नवे कायदे मोडणाऱ्या महिला किंवा मुलींना ताब्यात घेतले जाईल. आणि या कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार असलेले तालिबान अधिकारी त्यांना शिक्षा करतील. याशिवाय या कायद्यांतर्गत पुरुषांवरही काही बंधने लादण्यात आली आहेत. घरातून बाहेर पडताना पुरुषांना नाभीपासून गुडघ्यापर्यंत शरीर झाकून ठेवावे लागणार आहे.
अफगाणिस्तानातील संयुक्त राष्ट्राच्या विशेष प्रतिनिधी रोझा ओटुनबायेवा यांनी या निर्बंधांचा निषेध केला आहे. त्यांनी म्हटलं की, तालिबानने 2021 मध्ये सत्ता हाती घेतल्यापासून महिला आणि मुलींच्या हक्कांवर असह्य निर्बंध लादले गेले आहेत. 25 ऑगस्ट रोजी त्यांनी एक निवेदन जारी केले होते की, हे अफगाणिस्तानच्या भविष्यासाठी अस्वस्थ करणारे दृश्य आहे. जेथे नैतिक निरीक्षकांना कोणालाही धमकाविण्याचा आणि ताब्यात घेण्याचा अधिकार आहे. यामुळे अफगाण स्त्रिया आणि मुलींवर आधीच असह्य होणाऱ्या निर्बंधांना बळकटी मिळते.