
अथेन्स : ग्रीसजवळील (Greece) कारपाथोस बेटावर बुधवारी पहाटे एजियन समुद्रात (Aegean Sea) निर्वासितांची (Refugee) बोट बुडाल्याची (Boat Sinks) घटना घडली. या बोटीत सुमारे ८० लोक होते. त्यापैकी २९ जणांना वाचवण्यात यश आले आहे. बाकीचे बेपत्ता आहेत. ग्रीसचे तटरक्षक दल (Coast Guard Of Greece) घटनास्थळी पोहोचले असून त्यानंतर मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
सुटका केलेल्या स्थलांतरितांनी सांगितले की, ते तुर्कीतील अंताल्या येथून आश्रय घेण्यासाठी जात होते. पहाटे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बोट बुडाली. बहुतांश निर्वासित हे अफगाण, इराण आणि इराकमधील असून त्यांना इटलीत राहायचे होते.
तटरक्षक दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, तटरक्षक दलाच्या दोन गस्ती नौका, एक ग्रीक नौदलाचे जहाज, एक हवाई दलाचे हेलिकॉप्टर आणि जवळपास जाणारी तीन जहाजे बचावकार्यात सामील आहेत. ग्रीक अधिकाऱ्यांनी एजियनमध्ये गस्त वाढवली आहे. अनेक लोक ग्रीक बेटे सोडून इकडे तिकडे आश्रय घेण्यासाठी जात आहेत. ते थेट इटलीला जाण्यासाठी धोकादायक मार्ग घेत आहेत, जे बेकायदेशीर आहे.