Russia Ukraine War: युद्धादरम्यान रशियाने लागू केला टॅक्स; पर्यटकांच्या खिशावर होणार परिणाम?
मॉस्को: सध्या रशिया-युक्रेन युद्ध सुरु आहे. दरम्यान रशियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी, 1 जानेवारी 2025 पासून, रशियामध्ये पर्यटक कर लागू करण्यात आला आहे. हा कर पूर्वीच्या रिसॉर्ट शुल्काला बदलून लागू करण्यात आला आहे. या नव्या व्यवस्थेनुसार, हॉटेल आणि इतर निवासांमध्ये राहणाऱ्या पर्यटकांना त्यांच्या निवास खर्चाच्या 1 टक्के अतिरिक्त रक्कम भरावी लागणार आहे.
पर्यटक कर
हा कर जुलै 2024 मध्ये रशियन कर संहितेमध्ये केलेल्या सुधारणा अंतर्गत सादर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सुधारणांमध्ये ‘पर्यटक कर’ नावाचे नवीन प्रकरण जोडण्यात आले आहे. या अंतर्गत, प्रादेशिक अधिकाऱ्यांना स्थानिक कर म्हणून हा कर लागू करण्याचा अधिकार मिळाला आहे. अनेक क्षेत्रांमध्ये, विशेषतः पर्यटन उद्योग विकसित किंवा उभरत असलेल्या प्रदेशांमध्ये, हा कर आधीच लागू करण्यात आला आहे.
पर्यटक कर किती असेल?
2025 म्हणजेच आजपासून हा कर 1 टक्क्यांच्या दराने सुरू होणार आहे. तसेच 2027 पर्यंत कर टप्प्याटप्प्याने वाढवून 3 टक्के करण्यात येणार असल्याचे रशियाने म्हटले आहे. या करासाठी किमान दैनंदिन शुल्क 100 रूबल (सुमारे 0.9 अमेरिकी डॉलर) निश्चित करण्यात आले आहे. यामुळे कमीत कमी रक्कम कर स्वरूपात गोळा केली जाईल. याशिवाय, हा कर हॉटेल आणि निवास प्रदाते भरतील, परंतु त्याचा समावेश राहण्याच्या किंमतीत केला जाईल, यामुळे तो थेट पर्यटकांच्या खिशावर परिणाम करेल.
कोळशावरील निर्यात शुल्क हटवले
याशिवाय, रशियान सरकारने 1 जानेवारी 2025 पासून कोकिंग कोल, अँथ्रेसाइट आणि थर्मल कोलवर लागू असलेले निर्यात शुल्क अधिकृतपणे रद्द केले असल्याची माहिती मिळाली आहे. हे शुल्क 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू करण्यात आले होते आणि 2024 च्या शेवटपर्यंत अस्तित्वात होते. तथापि, 1 मे ते 30 नोव्हेंबर 2024 दरम्यान अँथ्रेसाइट आणि थर्मल कोलवरील शुल्क तात्पुरते स्थगित करण्यात आले होते.
सरकारचा निर्णय
मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर 2024 मध्ये, रशियन सरकारने कोकिंग कोलवरील निर्यात शुल्क पूर्वीच रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच कोळसा उद्योगाला समर्थन देण्यासाठी अँथ्रेसाइट आणि थर्मल कोलवरील शुल्क स्थगिती आता रशियाने कायम ठेवली आहे. रशियामध्ये पर्यटक कर लागू झाल्याने स्थानिक पर्यटन उद्योगाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे, परंतु पर्यटकांच्या खर्चात थोडी वाढ होणार आहे.