पाकिस्तान न्यायालयाने माजी मुख्यमंत्र्यांना सुनावली 34 वर्षांची शिक्षा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्लामाबाद: पाकिल्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने मंगळवारी गिलगित-बाल्टिस्तान प्रांताच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने माजी मुख्यमंत्री खालिद खुर्शीद खान यांना 34 वर्षांच्या तुरुंगवासाची व 6 लाख पाकिस्तानी रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खालिद यांच्यावर सुरक्षा यंत्रणांना धमकावण्याचा तसेच हिंसाचार भडकावण्याचा आरोप होता. 31 डिसेंबर 2024 रोजी या प्रकरणाचा निकाल लागला.
हिंसा भडकवण्याचा प्रयत्न
जुलै 2024 मध्ये गिलगितमध्ये झालेल्या विरोध प्रदर्शनानंतर खालिद खुर्शीद यांच्या विरोधात राजद्रोह व दहशतवादाशी संबंधित गुन्हे दाखल करण्यात आले होते. या वेळी त्यांनी एका भाषणाद्वारे गिलगित-बाल्टिस्तानच्या मुख्य सचिव, पोलीस अधिकारी आणि गुप्तचर संस्थांना धमक्या दिल्याचे आरोप आहेत. त्यांनी सत्तेवर परत आल्यास कोणालाही सोडणार नाही, असे वक्तव्य त्यांनी केले होते. न्यायालयाने सांगितले की, खालिद खुर्शीद यांनी संवेदनशील संस्थांविरुद्ध हिंसा भडकवण्याचा प्रयत्न केला.
फरार असलेल्या खालिद खुर्शीद यांची चौकशी
गुन्हा दाखल झाल्यानंतर संयुक्त तपास पथक (JIT) स्थापन करण्यात आले. या पथकाच्या चौकशीत खालिद खुर्शीद दोषी आढळले. साक्षीदारांनी दिलेल्या पुराव्यांवरून न्यायालयाने खालिद खुर्शीद यांना विविध कलमांतर्गत दोषी ठरवत 34 वर्षांची कारावासाची व 6 लाख दंडाची शिक्षा सुनावली आहे.
6 लाख रुपयांचा दंड व कायदेशीर कारवाई
मीडिया रिपोर्टनुसार, कोर्टाने खालिद खुर्शीद यांना 6 लाख पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याचबरोबर पोलिसांना त्यांना अटक करून शिक्षा अंमलात आणण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, नेशनल डेटाबेस अँड रजिस्ट्रेशन अथॉरिटी (एनएडीआरए) यांना खालिद खुर्शीद यांचे राष्ट्रीय ओळखपत्र (CNIC) ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे त्यांच्या कायदेशीर स्थितीवर नकारात्मक परिणाम झाला आहे.
खालिद खुर्शीद खान यांचा राजकीय प्रवास
खालिद खुर्शीद खान हे पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे नेते आहेत. इम्रान खान यांच्या कार्यकाळात ते गिलगित-बाल्टिस्तानचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. 2020 ते जुलै 2023 या कालावधीत खुर्शीद यांनी मुख्यमंत्री पद भूषवले. मात्र, फर्जी डिग्री प्रकरणात त्यांना अयोग्य ठरवण्यात आले आणि त्यांनी मुख्यमंत्रीपदावरुन हटवण्यात आले. सध्या फरार असलेल्या खालिद खुर्शीद यांच्या अटकेसाठी आणि शिक्षेसाठी पाकिस्तानी प्रशासन कठोर पावले उचलत आहे. त्यांच्या या शिक्षेमुळे पाकिस्तानच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.