Saudi Arabia: मध्य पूर्वेत नवे राजकीय समीकरण; हुथींविरुद्धच्या लढ्यात सौदी अरेबियाने मागितली इस्रायलची अप्रत्यक्ष मदत ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
मध्य पूर्वेतील सुरक्षा आणि जागतिक तेल वाहतुकीच्या संदर्भात एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. येमेनमधील इराण-समर्थित हुथी बंडखोरांचे वाढते वर्चस्व आणि त्यांनी ताबा मिळवलेली मोक्याची ठिकाणी यांमुळे सौदी अरेबिया (Saudi Arabia) गंभीर चिंतेत सापडला आहे. ‘इस्रायल हायोम’च्या (Israel Hayom) अहवालानुसार, सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी आखाती देश, इजिप्त आणि थेट अमेरिकन लष्कराच्या सेंट्रल कमांड (US CENTCOM) द्वारे इस्रायलकडे अप्रत्यक्षपणे गुप्तचर माहिती (Intelligence) आणि लष्करी सहकार्याची मागणी केली आहे.
हुथी बंडखोरांनी लाल समुद्राला एडनच्या आखाताशी जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या ‘बाब अल-मंदेब’ (Bab al-Mandeb) सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हा जलमार्ग बंद झाल्यास आंतरराष्ट्रीय सागरी व्यापार आणि विशेषतः मध्य पूर्वेतून युरोप व आशियाकडे होणारी कच्चे तेल (Crude Oil) आणि एलएनजीची (LNG) वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
सौदी अरेबियाने स्पष्ट केले आहे की, बाब अल-मंदेब सामुद्रधुनीतील अडथळा केवळ सौदीपुरता मर्यादित नसून तो संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेसाठी विनाशकारी ठरू शकतो. या सामुद्रधुनीतील नाकेबंदीमुळे होणारे नुकसान होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) बंद झाल्याने होणाऱ्या नुकसानापेक्षाही मोठे असू शकते, असा इशारा क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी दिला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Dario Amodei: AIची आंधळी शर्यत थांबवा! अँथ्रोपिकचे सीईओ डारिओ अमोदेई यांचा इशारा; मानवी सुरक्षिततेसाठी ‘स्पीड ब्रेक’ आवश्यक
गेल्या काही आठवड्यांत हुथींच्या हल्ल्यांमुळे आणि पाइपलाइनच्या सुरक्षेच्या कारणामुळे सौदी अरेबियाला आपल्या यान्बू (Yanbu) बंदरातून पूर्वेकडील देशांकडे जाणारे तेल टँकर्स लांबच्या आफ्रिका खंडाच्या मार्गाने (Cape of Good Hope) वळवावे लागले आहेत. याशिवाय, इजिप्तच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेला ‘सुएझ कालवा’ (Suez Canal) देखील या नाकेबंदीमुळे धोक्यात आला आहे, ज्यामुळे इजिप्तनेही सौदी अरेबियाच्या या आवाहनाला आणि अमेरिकेशी केलेल्या चर्चेला पाठिंबा दर्शवला आहे.
या संपूर्ण तणावाच्या काळात अमेरिकन सैन्याचे ‘सेंटकॉम’ (CENTCOM) कमांडर ॲडमिरल ब्रॅड कूपर यांनी सौदी अरेबियाचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. सध्या सौदीमध्ये डझनभर अमेरिकन लष्करी अधिकारी उपस्थित असून ते गुप्तचर माहितीची देवाणघेवाण करत आहेत. अमेरिकन लष्कर बाब अल-मंदेब जवळील हुथींच्या नवीन रडार आणि क्षेपणास्त्र तळांवर हवाई हल्ले करण्याची योजना आखत आहे.
मात्र, राजकीय वर्तुळातील माहितीनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या या युद्धात अमेरिकेला थेट आणि पूर्ण लष्करी ताकदीने उतरवण्यास घाई करत नाहीत. ट्रम्प प्रशासनाचा हा संकोच सौदी अरेबियासाठी डोकेदुखी ठरत असून, यामुळेच सौदीला इस्रायलसारख्या प्रादेशिक महासत्तेची मदत घेण्याची गरज भासत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-Bangladesh Ties : शेख हसीनांचा काळ ‘अस्वस्थ करणारा’; बांगलादेशची भारतासोबत ‘रिसेट’ची मागणी, 101 करार होणार रद्द?
गाझा पट्टीत इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर हुथी बंडखोरांनी पॅलेस्टिनींच्या समर्थनाचा दावा करत नोव्हेंबर २०२३ पासून लाल समुद्रातील व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली होती. इस्रायलने यापूर्वी हुथींच्या अनेक उच्चपदस्थ कमांडर्सना हवाई हल्ल्यात ठार केले असले, तरी हुथींची लष्करी ताकद अजूनही कायम आहे. सध्याच्या परिस्थितीत हुथींच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी इस्रायल, सौदी अरेबिया आणि अमेरिका यांच्यात गुप्तचर स्तरावर पडद्यामागून मोठ्या घडामोडी सुरू असल्याचे आंतरराष्ट्रीय विश्लेषकांचे मत आहे.






