Sundar Pichai: सुंदर पिचाई यांचा स्टॅनफोर्डमध्ये निषेध; त्यांच्या भाषणादरम्यान विद्यार्थ्यांनी केली घोषणाबाजी आणि केला सभात्याग ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Sundar Pichai Stanford speech protest : अमेरिकेतील नामांकित स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या (Stanford University) १३५ व्या दीक्षांत समारंभात एक धक्कादायक आणि अभूतपूर्व प्रकार समोर आला आहे. जगातील आघाडीची टेक कंपनी ‘गुगल’चे (Google) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुंदर पिचाई हे जेव्हा विद्यापीठाच्या स्टेडियममध्ये मुख्य वक्ता म्हणून भाषण देण्यासाठी मंचावर आले, तेव्हाच शेकडो पदवीधर विद्यार्थ्यांनी त्यांना तीव्र विरोध दर्शवला. पिचाई यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताच विद्यार्थ्यांच्या काही गटांनी शिट्ट्या वाजवून गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि हातामध्ये पॅलेस्टाईनचे झेंडे व फलक घेऊन ‘फ्री, फ्री पॅलेस्टाईन’ अशा घोषणा देत थेट समारंभातून बाहेर पडणे (Walkout) पसंत केले. या अचानक झालेल्या आंदोलनामुळे स्टेडियममधील वातावरण काही काळासाठी अत्यंत तणावपूर्ण बनले होते.
स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या या ऐतिहासिक पदवीदान सोहळ्याला २० हजारांहून अधिक लोक उपस्थित होते, ज्यामध्ये ३,६०० हून अधिक पदवीधर विद्यार्थ्यांचा समावेश होता. या मोठ्या जनसमुदायासमोर ‘स्टुडंट्स फॉर जस्टिस इन पॅलेस्टाईन’ (SJP) आणि ‘नो टेक फॉर अपार्टहाइड’ (No Tech for Apartheid) यांसारख्या मोठ्या विद्यार्थी संघटनांनी आधीच या आंदोलनाची योजना आखली होती. सुंदर पिचाई हे स्वतः स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे माजी विद्यार्थी राहिले आहेत, त्यांनी १९९५ मध्ये येथून एमएस (MS) ची पदवी घेतली होती. मात्र, आपल्याच मातृसंस्थेत त्यांना अशा तीव्र विरोधाचा सामना करावा लागेल, अशी कल्पना कदाचित कोणी केली नसावी.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Shangri La Dialogue: ‘फुकटची सुरक्षा मिळणार नाही’; अमेरिकेने आशियाई देशांना थेट सुनावले; जीडीपीच्या 3.5% खर्चाची मागणी
स्टॅनफोर्डच्या विद्यार्थ्यांनी केलेला हा विरोध सुंदर पिचाई यांच्या वैयक्तिक कार्याविरुद्ध नव्हता, तर तो गुगल कंपनीच्या इस्रायल सरकारसोबत असलेल्या व्यावसायिक कराराच्या विरोधात होता. या कराराचे नाव ‘प्रोजेक्ट निंबस’ (Project Nimbus) असे आहे. हा प्रकल्प गुगल आणि ॲमेझॉन (Amazon) या दोन बलाढ्य टेक कंपन्यांनी इस्रायली सरकार आणि तिथल्या संरक्षण मंत्रालयासोबत २०२१ मध्ये स्वाक्षरी केलेला १.२ अब्ज डॉलर्सचा (अंदाजे १०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त) एक महाकाय क्लाउड कंप्युटिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) करार आहे.
आंदोलक विद्यार्थी आणि विविध आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांचा असा आरोप आहे की, गुगल या प्रकल्पाच्या माध्यमातून इस्रायली लष्कराला आणि सुरक्षा दलांना अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि क्लाउड सेवा पुरवत आहे. सध्या गाझा पट्टीमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, या एआय तंत्रज्ञानाचा वापर पॅलेस्टिनी नागरिकांवर पाळत ठेवण्यासाठी आणि त्यांच्यावरील लष्करी कारवाया अधिक तीव्र करण्यासाठी केला जाऊ शकतो, अशी भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. “आम्हाला पॅलेस्टिनींच्या हत्येतून आणि त्यांच्यावरील पाळत ठेवण्याच्या तंत्रज्ञानातून श्रीमंत होणारा कोणताही अब्जाधीश मार्गदर्शक म्हणून नको आहे,” अशी भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली.
या अभूतपूर्व गोंधळानंतरही सुंदर पिचाई यांनी अत्यंत संयमाने आपले भाषण सुरू ठेवले आणि त्यांनी तंत्रज्ञान किंवा एआय (AI) या विषयावर बोलणे टाळले. त्याऐवजी त्यांनी आपल्या वैयक्तिक प्रवासावर आणि सकारात्मकतेवर (Optimism) भर दिला. पिचाई यांनी आठवण करून दिली की, जेव्हा त्यांना स्टॅनफोर्डमध्ये प्रवेश मिळाला, तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांच्या विमानाचे तिकीट काढण्यासाठी आपल्या संपूर्ण वर्षाचा पगार खर्च केला होता आणि तो त्यांचा विमानातील पहिलाच प्रवास होता.
HUNDREDS of Stanford graduates walk out as Google CEO Sundar Pichai takes the stage — chanting ‘FREE PALESTINE’ pic.twitter.com/Qwyo3XoIrV — RT (@RT_com) June 15, 2026
credit – social media and Twitter
चालू जागतिक परिस्थितीवर अप्रत्यक्षपणे भाष्य करताना पिचाई म्हणाले, “आजच्या बातम्या पाहिल्यावर असे वाटू शकते की आपण अत्यंत आव्हानात्मक आणि कठीण काळात जगत आहोत. परंतु, आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की प्रत्येक पिढीने आपापल्या काळातील वेगवेगळ्या संकटांचा सामना केला आहे. आपण कोणत्या जगात पदवीधर होऊन बाहेर पडत आहोत हे आपण ठरवू शकत नाही, पण आपण आपल्या परिस्थितीला कसे सामोरे जायचे, हे आपण नक्कीच ठरवू शकतो.” तथापि, कार्यक्रमानंतर जेव्हा बीबीसी (BBC) च्या महिला पत्रकाराने त्यांना थेट विचारले, “मिस्टर पिचाई, आजच्या आंदोलकांबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे?” तेव्हा त्यांनी पूर्णपणे मौन बाळगले आणि कोणत्याही प्रश्नाचे उत्तर न देता ते पुढे निघून गेले. हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-Slovakia Ties: ‘फुले नाहीत, ना हार’ स्लोव्हाकियामध्ये PM मोदींचे ‘ब्रेड आणि मीठ’ देऊन स्वागत; जाणून घ्या यामागील रंजक कारण
स्टॅनफोर्डमधील या घटनेचे तीव्र पडसाद अमेरिकेच्या व्यावसायिक आणि राजकीय वर्तुळात उमटले आहेत. विख्यात भारतीय-अमेरिकन उद्योगपती आणि व्हेंचर कॅपिटलिस्ट विनोद खोसला (Vinod Khosla) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत विद्यार्थ्यांवर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली. खोसला यांनी लिहिले, “या स्टॅनफोर्डच्या विद्यार्थ्यांचा मूर्खपणा पाहा, ज्यांनी गुगल आणि सुंदर पिचाई यांच्यासारख्या व्यक्तीवर बहिष्कार टाकला, ज्यांनी मानवतेमध्ये समानतेची सर्वात मोठी संधी निर्माण केली आहे. हे विद्यार्थी अत्यंत पूर्वग्रहदूषित, मूर्ख, अदूरदर्शी आणि स्वार्थी आहेत. जगातील तळाच्या ३ अब्ज लोकांना एआय (AI) मुळे काय फायदा होऊ शकतो याकडे दुर्लक्ष करून ते स्वतःच्या चुकीच्या माहितीवर आधारित स्वार्थाची चिंता करत आहेत.”
विनोड खोसला यांच्या या आक्रमक पोस्टला अमेरिकेचे भारतीय वंशाचे खासदार रो खन्ना (Ro Khanna) यांनी सडेतोड उत्तर दिले. खासदार खन्ना म्हणाले, “माझ्या माहितीनुसार, या विद्यार्थ्यांनी गाझामधील इस्रायली लष्कराच्या कारवाया आणि गुगलच्या कराराचा निषेध करण्यासाठी हा सभात्याग केला होता. या कराराबाबत कोणाचेही मत काहीही असले, तरीही मला वाटते की तुम्ही लोकशाहीत त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आणि निषेधाच्या अधिकाराचे नक्कीच समर्थन केले पाहिजे.” या घटनेने गुगलमधील अंतर्गत असंतोष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणला आहे, कारण यापूर्वीही गुगलने ‘प्रोजेक्ट निंबस’चा निषेध करणाऱ्या आपल्या डझनभर कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले होते.






