न्यूयॉर्कच्या लागार्डिया विमानतळावर दोन विमानांची टक्कर; एक प्रवासी जखमी, प्रवाशांची ७ तास फरफट ( फोटो : संग्रहित फोटो)
वॉशिंग्टन : अमेरिकेतील लागार्डिया विमानतळावर टॅक्सीवेवर दोन विमानांची टक्कर झाली. दोन्ही विमाने डेल्टा एअरलाइन्सची उपकंपनी असलेल्या एंडेव्हर एअरची असल्याची माहिती दिली जात आहे. या अपघातात एक प्रवासी जखमी झाला. अपघातानंतर दोन्ही विमानांमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आणि बसने टर्मिनलवर नेण्यात आले, अशी माहिती समोर आली आहे.
एक विमान लँडिंगनंतर गेटजवळ येत असताना रात्री ९:५८ वाजता (स्थानिक वेळेनुसार) टेकऑफच्या तयारीत असलेल्या दुसऱ्या विमानाशी टक्कर झाली. विमानाचा एक पंख पूर्णपणे तुटला. त्यामध्ये एक प्रवासी जखमी झाला आहे. या जखमी प्रवाशाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही विमाने बॉम्बार्डियर CRJ-900 मॉडेलची होती. या अपघातानंतर डेल्टा एअरलाइन्सने एक निवेदन जारी केले आहे. त्यामध्ये दोन्ही विमानांमध्ये कमी वेगाने टक्कर झाली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. फ्लाइट ५०४७, चार्लोट, नॉर्थ कॅरोलिना येथून येणारी आणि फ्लाइट ५१५५, रोआनोके, व्हर्जिनियाला जाणारी विमाने होती.
एअरलाइन्सच्या माहितीनुसार, फ्लाइट ५१५५ मधील एक पंख फ्लाइट ५०४७ च्या विमानावर आदळला. एका फ्लाइट अटेंडंटला किरकोळ दुखापत झाली आणि तिला घटनास्थळी प्राथमिक उपचार देण्यात आले. नंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले.
दोन्ही विमानांमध्ये अनेक प्रवासी
फ्लाइट ५१५५ मध्ये एकूण ३२ लोक होते, ज्यात २८ प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. फ्लाइट ५०४७ मध्ये ५७ प्रवासी आणि चार क्रू मेंबर्ससह ६१ लोक होते. फ्लाइट ५०४७ मधील एका पत्रकाराने टक्कर झाल्यानंतर दुसऱ्या विमानाच्या तुटलेल्या पंखाचा व्हिडिओ त्याच्या मोबाईल फोनवर रेकॉर्ड केला.