अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्धात सहभागी होणार?
इराण-इस्रायल संघर्ष पेटला असून भीषण युद्धाची शक्यता आहे. दरम्यान इस्रायलची पाठराखरण करणाऱ्या अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका USS निमित्झने आज सकाळी मध्य पूर्वेकडे म्हणजेच अरबस्थानाकडे प्रस्थान केलं. अमेरिकेची ही युद्धनौका दक्षिण चीन समुद्रातून तैनात करण्यात आली होती. व्हिएतनाममधील डानांग शहरात होणारा निमित्जचा नियोजित पोर्ट कॉल आणि त्यासाठीचा स्वागत समारंभ अचानक रद्द करण्यात आला, त्यावेळी या हालचाली समोर आल्या आहेत.
या आठवड्याच्या भेटीसाठी दानांग शहरात २० जून रोजी औपचारिक स्वागत समारंभ नियोजित होता. या समारंभात एक राजनैतिक अधिकारी सहभागी झाला होता. तर हनोई येथील अमेरिकन दूतावासाने अमेरिकन दूतावासाने हा कार्यक्रम रद्द करण्याची माहिती दिली आणि याला एका मोठ्या मोहिमेशी जोडण्यात येत आहे, अशी माहिती एका आंतरराष्ट्रीय वृत्त संस्थेनी दिली आहे. मात्र यासंदर्भात अमेरिकेने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
गेल्या आठवड्यात USS निमित्ज कॅरियर स्ट्राइक ग्रुपने दक्षिण चीन सागरात समुद्री सुरक्षा मोहिमा (Maritime Security Operations) पार पाडल्या होत्या. यूएस पॅसिफिक फ्लीटच्या कमांडरच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमा इंडो-पॅसिफिक क्षेत्रात अमेरिकन नौदलाची नियमित उपस्थिती दर्शवतात.
Marine Traffic संकेतस्थळावरून मिळालेल्या डेटा नुसार, USS निमित्ज सोमवारी सकाळी मध्य पूर्वाच्या दिशेने प्रस्थान करताना दिसून आली. सध्या इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव वाढत असून या पार्श्वभूमीवर अमेरिकन नौदलाची ही हालचाल रणनीतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
USS निमित्जचा अचानक पोर्ट कॉल रद्द होणे, आणि त्याच वेळी पश्चिमेकडे—म्हणजेच मध्य पूर्वाकडे—हालचाल करणे, यामुळे अमेरिकेच्या क्षेत्रीय सुरक्षाविषयक धोरणांमध्ये काही बदल होत असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अमेरिकन नौदल आणि राजनैतिक अधिकाऱ्यांकडून यावर अधिकृत आणि सविस्तर माहिती येणे अद्याप बाकी आहे. तथापि, या हालचालींनी इंडो-पॅसिफिक आणि मध्य पूर्व या दोन्ही भागांतील सामरिक समीकरणांवर परिणाम होऊ शकतो.