अमेरिकेने रशियावर नवीन निर्बंध लादले; उर्जा क्षेत्रावर मोठा आघात, युक्रेनला होणार फायदा?
वॉश्गिंटन: अमेरिकेचे निवृत्त होणार राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी कार्यकाळाच्या शेवटच्या टप्प्यात रशियाला मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेने रशियाच्या ऊर्जा क्षेत्रावर नवे आणि कठोर प्रतिबंध लादले आहेत. बाइडेन यांनी सांगितले की, युक्रेनला त्याची स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी आणि मॉस्कोविरुद्धच्या संघर्षात मदत करण्यासाठी हे प्रतिबंध आवश्यक असल्याचे म्हटले आहे. यामुळे रशियाच्या उर्जा क्षेत्रावर मोठा आघात झाला आहे.
दोन भारतीय कंपन्यांचाही समावेश
अध्यक्ष जो बाइडेन यांनी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सत्तांतर होण्याच्या दहा दिवस आधी, रशियाच्या गॅस आणि ऊर्जा निर्यातीत मदत करणाऱ्या अनेक कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या कंपन्यांमध्ये भारतातील दोन कंपन्यांचाही समावेश आहे. या कंपन्या ‘स्काईहार्ट मॅनेजमेंट सर्व्हिसेस’ आणि ‘एविजन मॅनेजमेंट सर्व्हिसेस’आहेत. या कंपन्यांच्या विरोधात कारवाई करताना, बाइडेन यांनी स्पष्ट केले आहे की, या प्रतिबंधांमुळे रशियन अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना युद्ध चालवणे अधिक कठीण होईल.
गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता
याशिवाय, बाइडेन यांनी पत्रकारांशी संवाद साधताना असेही म्हटले आहे की, या प्रतिबंधांमुळे गॅसच्या किमती प्रति गॅलन 0.03 ते 0.04 डॉलर्सने वाढू शकतात. मात्र, या निर्णयाचा उद्देश रशियाच्या युद्धक्षमता कमी करणे हा आहे. त्यांनी असेही नमूद केले की, पुतिन यांच्यासाठी सध्याची परिस्थिती खूप कठीण झाली आहे. या निर्णयामुळे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या आर्थिक आणि राजकीय समस्यांमध्ये आणखी भर पडणार आहे.
ऊर्जा क्षेत्रावर मोठा आघात
अमेरिकेच्या या घोषणेचा उद्देश रशियाच्या महत्त्वपूर्ण ऊर्जा क्षेत्रावर प्रहार करणे असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धादरम्यान, रशियाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा अमेरिकेचा हा आणखी एक प्रयत्न आहे. यामुळे युक्रेनला अमेरिकाचा पाठिंबा अजूनही मिळत आहे.
ट्रम्प यांचा संघर्ष संपवण्याचा निर्धार
याचदरम्यान ट्रम्प -पुतिन भेटीविषयी देखील दुसरीकडे चर्चा सुरु आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध लवकर संपवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यामुळे ट्रम्प लवकरच पदभार स्वीकारणार असून, त्यांच्या धोरणांमुळे युक्रेन-रशिया संघर्षावर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असल्याचे मानले जात आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे जागतिक पातळीवर ऊर्जा क्षेत्रात अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे, पण युक्रेनसाठी हा एक महत्त्वाचा आधार ठरू शकतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- लवकरच होणार ट्रम्प-पुतिन यांची भेट; रशिया म्हणाला ‘आम्ही चर्चेसाठी…’