भारतातील अनेक ठिकाणे सरोवर आणि तलाव यांनी व्यापलेली आहेत. यातील अनेक सरोवरे हे नैसर्गिक प्रक्रियेतून तयार झालेले असून काही सरोवरे हे मानवनिर्मित आहेत. यातील अनेक सरोवर हे अनादी काळापासून परमपवित्र आहेत आणि त्याला प्राचीन इतिहास, धार्मिक रूढी-परंपरा यांचा इतिहास आहे. तसे बघितले तर सरोवर, तलाव म्हणजे खार्या आणि गोड पाण्याचा पृथ्वीवरील मोठ्या आकाराचा जलसाठा..! पर्जन्यसृष्टीच्या माध्यमातून जमिनीच्या खोलगट भागात राखून ठेवलेले पाणी म्हणजे तलाव. या सरोवरात कधीच वाहते पाणी नसते.. तो कुठल्याही समुद्राचा तो भाग नसतो.. ते तळेसुद्धा नसते तर तो एक भौगोलिक पर्यावरणाद्वारे तयार झालेला आणि संथ असलेला खोलवरचा जलसाठा असतो..!
पश्चिम सिक्किमची राजधानी असलेल्या गेझिंग जवळचे पेलिंग नावाचे सर्वांग सुंदर लहानसे शहर आहे. उंच उंच हिमायलयीन पर्वतराजींनी वेढलेले सिक्किम हे सुंदर राज्य भारतातल्या इतर सरोवरांच्या बाबतीत एकदम ‘हटके’ आहे. सिक्कीममध्ये दोनशेच्या वर सरोवर असूनही या राज्यातले लोक पाण्यासोबत कधीच ‘खेळ’ करत नाही. येथे पाण्याला देवतेचा पवित्र दर्जा दिलेला आहे. म्हणुनच सिक्कीममध्ये कुठेही ‘वॉटर गेम आणि वॉटर स्पोर्ट्स’ नाहीत. सरोवराच्या पाण्याला ते स्पर्श करण्याचे टाळतात आणि त्याचा आदर करतात. असेच एक सर्वसामान्यांना अज्ञात असलेले पश्चिम सिक्किममधील पवित्र असे साडेतीन हजार वर्षापूर्वीचे अतिपुरातन मनुष्याच्या पावलाच्या आकाराचे ‘खेचेओपलरी लेक’.. !चहुबाजुच्या गगनचुंबी पर्वतराजीत वसलेले हे भारावून टाकणारे जलाशय समुद्रसपाटी पासून सतराशे मीटर उंचीवर आहे…! एक परम पवित्र सरोवर…! हे नावही काहीसे आडवळणाचे आहे. येथे ‘खेचेओपलरी’ नावाचा पर्वत येथे असून याच नावाचे एक लहानसे खेडेसुद्धा आहे. याचे मुळ नाव आहे ‘खा-चोट-पलरी’ म्हणजे ‘गुरु पद्मसंभव नावाच्या देवतेचा स्वर्ग’…! पद्मसंभव हे तिबेटचे सर्वोच्च धार्मिक गुरु आणि प्राचीन देवता मानली जाते. आणि त्यांचे नाव आहे ‘गुरु रिंपोचे’. यांना आधुनिक तिबेटमध्ये गौतम बुद्धाचे प्रतिरूप मानण्यात येते. ते सर्व प्राचीन अस्त्र-शस्त्रांनी परिपूर्ण असल्याने ते वज्र निर्धारचे स्वरूप आहे. त्यामुळे ते ‘वज्रायन’ म्हणूनसुद्धा ओळखले जातात. या स्थानाचे मजेशीर स्थानिक नाव आहे ‘ओह लेडी..! सिट हीअर..!’ (‘अहो बाई ..! इथे बसा’..!) असीम शांततेची अनुभूति अनुभवण्याकरिता अनेक लोक आणि पर्यटक येथे येत असतात. पेलिंग शहरापासून हे ‘लेक’ केवळ २२ किलोमीटरवरच्या अंतरावर आहे. ग्यालशिंग आणि युक्सुमच्या मधोमध अतिशय गर्द हिरव्याकंच झाडीत हे जलाशय लपलेले आहे. बसमधून उतरल्यावर या अनोळखी खेड्यातील तिबेटीयन गरीबी दिसायला लागते. लहान लहान टपरीसारखे चहा, बिस्किट आणि कोल्ड्रिंक्सची दुकाने बघून आनंद होतो. तिबेटीयन महिला पुरुषांची आणि त्यांच्या लहान गोड गोर्यागोमट्या मुलांची पर्यटक आल्यानंतरची धावपळ आणि लगबग कौतुकाने बघण्यासारखी असते. आनंदमिश्रित कुतूहल वाटायला लागते. ताजेतवाने झाल्यावर आपण या पवित्र जलाशयाकडे पाऊल वाटेने चालायला लागतो. प्रवेशद्वारासमोरच अर्धवर्तुळाकार ‘खेचेओपलरी लेक’ हा फलक दिसायला लागतो आणि दिशानिर्देश करणारे काही फलक दिसायला लागतात. ही शांत सुंदर पाउलवाट साधारणतः एक किलोमीटरची आणि बर्यापैकी रुंद असून दोन्ही बाजूंच्या सभोवतालच्या वृक्ष वेलींनी बहरलेली आहे. शेवटच्या टोकावर हे मनुष्याच्या पावलांच्या आकाराच्या जलाशयाचे दर्शन होते. या सुंदर पाउलवाटेने चालतांना आपल्या शरीरात चैतन्याचा झरा वहायला लागतो आणि अद्भुत शांतीच्या मार्गाकडे मार्गक्रमण करत असल्याची अनुभुति जाणवायला लागते. हिमालयाचा हा अज्ञात आणि अपरिचित भाग आहे आणि सिक्कीममधले सर्वात स्वच्छ सरोवर आहे. हे जलाशय पुरातन काळापासून अतिशय पवित्र मानल्या गेलेले आहे. हे मोठे जलाशय मनुष्याच्या पावलाच्या आकाराचे आहे. यावर बौद्ध समाजाची आणि हिंदुसमाजाची प्रचंड श्रद्धा आणि धार्मिक आस्था आहे. कारण याला पारंपरिक पौराणिक कथांची जोड आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार प्रत्यक्ष भगवान शंकर हे हिमालयात भ्रमण करीत असताना या ठिकाणावरच्या गुंफेत काही काळ ध्यान करून तपश्चर्या केली. काही दिवसांनी ध्यान संपल्यावर त्यांनी आपली ‘पाऊलखुण’ या जागेवर अधोरेखित केली. कालांतराने भगवान शंकराची ही पाऊलखुण उमटली आणि पर्जन्यवृष्टीने हे पावलाच्या आकाराचे जलाशय हळूहळू मोठमोठे होत गेले ही हिंदू धर्माची मान्यता. त्यामुळे हे हिंदू समाजाकरिता हे धार्मिक आस्थेचे ठिकाण झाले.
बौद्ध धर्माच्या मान्यतेनुसार भगवान गौतम बुद्ध भ्रमण करत असताना त्यांनी या ठिकाणी अद्भुत शांतीचा अनुभव घेतला आणि काही काळ ध्यान आणि तपस्येत घालविला. या जागेवर ध्यान आणि तप करीत असताना त्यांची पाऊले जमिनीवर खोलगट भागात उमटली आणि पावसाच्या माध्यमातून हा पावलांचा आकार नैसर्गिक प्रक्रियेने मोठा होत गेला आणि आजच्या सरोवराचे स्वरूप दिसायला लागले. त्यामुळे बौद्धधर्माच्या आस्थेचे हे सिक्किममधले प्रमुख केंद्र झाले. आज हे सरोवर हिंदू आणि बौद्ध धर्माकरिता परमपूजनीय श्रद्धेचे धार्मिक स्थळ झालेले आहे. आज हे स्थळ स्वर्गासारखेच सुंदर आहे अशी अनुभुति येते. येथे पांढरा स्वच्छ कापडाचा तुकडा लाकडाला बांधून नवससुद्धा करता येतो. मनुष्याची इच्छापूर्ती करणारे हे सरोवर आहे अशीही पारंपारिक मान्यता आहे. येथील अनेक मंदिरात नागपंचमीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केल्या जातो. या सरोवराचे संरक्षण आणि स्वच्छता येथील पशुपक्षी करतात अशी पुर्वापार मान्यता आहे. या सरोवराच्या पाण्यात एखाद्या झाडाचे पान जरी पडले तरी पक्षी ताबडतोब येऊन ते पान घेऊन जातात आणि सरोवर स्वच्छ ठेवतात हे पारंपरिक सत्य आजही बघायला मिळते. पाण्यात कुठेही अस्वच्छता आणि कचरा नाही. या पाण्यात अनेक रंगीत लहान मासे विहार करताना दिसतात. हे दृश्य अतिशय मनोवेधक आहे. स्थानिक लोक नेहमीच म्हणतात की या सरोवरावर मनुष्याचीच नाही तर पशुपक्षांचीही धार्मिक आस्था आहे. सिक्किम सरकारने या सरोवराला कायदेशीर संरक्षण दिलेले आहे. या सरोवराच्या काठावर एक लांब झोपडीवजा कॉरिडॉर असून त्या भोवती अनेक पंचरंगी तोरणे लावलेली आहेत. या कॅरिडॉरच्या आत अनेक दिव्यांची रांग दिसते. तिबेटीयन बौद्ध संस्कृतीचे अनेक धर्मचक्र, काही फोटो आणि मूर्ती येथे आहेत. अनेक पर्यटक आणि स्थानिक लोक रोज या सरोवराचे थोडे पाणी आणून पारंपारिक पद्धतीने पूजा करतात आणि दिवे उजळवुन, तीर्थ घेऊन सरोवरला श्रद्धेने नमन करतात. या कॅरिडॉरपासून सरोवरापर्यंत एक छोटा लाकडी पूल असून त्याला ‘जट्टी’ म्हणतात. पर्यटकांना सहसा त्या वरुन जाऊ देत नाही. पाण्यात पाय टाकून बसण्याची अनुमती येथे नाहीच. फक्त दुरून दर्शन घेता येते. येथले कर्मचारीच पाण्याला स्पर्श करून धार्मिक विधी करिता घडाभार पाणी आणतात. एक धार्मिक येथे शिस्त बघायला मिळते. याच मार्गावर समोर गेल्यावर भगवान शंकराच्या तपश्चर्येची गुंफा आहे. पण हा मार्ग अतिशय खडतर आहे. वेळसुद्धा भरपूर हवा. त्रिशूळ असणारी शंकराची अनेक लहान मंदिरेसुद्धा बघायला मिळतात. या सरोवराच्या अवती भोवती मोजकेच सुंदर ‘होम स्टे’ असून ते सहाशे ते दीड हजार रुपयापर्यंत रात्रभरच्या मुक्कामाकरिता मिळतात. या नैसर्गिक ठिकाणी एक रात्र घालवुन पशुपक्षांच्या सान्निध्यात पहाटेची अद्भुत शांतता अनुभवता येते.असे हे धार्मिक आस्थेचे स्वर्गीय अनुभूति देणारे पेलिंग शहाराजवळचे पवित्र ‘खेचेओपलरी लेक’..! एक सुंदर सरोवर..! निसर्गातले शांत जलाशय ..!
– श्रीकांत पवनीकर
sppshrikant81@gmail.com






