
इलेक्ट्रिक कारच्या मार्केटमध्ये चीनची BYD कंपनी लागोपाठ नवनवीन टेक्नोलॉजी सादर करत आहे. आता कंपनीने 2026 पॅरिस मोटर शोमध्ये आपली फ्लॅगशिप इलेक्ट्रिक एसयूव्ही BYD Atto 8 सादर केली आहे. ही 7-सीटर एसयूव्ही दुसऱ्या जनरेशनच्या ब्लेड बॅटरी आणि फ्लॅश चार्जिंग टेक्नोलॉजीसह येते. युरोपमध्ये या कारची विक्री 2027 च्या पहिल्या तिमाहीत सुरू होणार आहे.
या कारमधील सर्वात चर्चेचा मुद्दा म्हणजे तिचा चार्जिंग स्पीड. कंपनीच्या दाव्यानुसार, 115 kWh बॅटरीला सुसंगत फ्लॅश चार्जिंग स्टेशनवर फक्त 5 मिनिटांत 10% वरून 70% पर्यंत चार्ज करता येते. तर 10% ते 97% चार्ज होण्यासाठी केवळ 9 मिनिटे लागतात. उणे 30 अंश सेल्सिअस तापमानातही 20% ते 97% चार्जिंगसाठी 12 मिनिटे लागतात, असा कंपनीचा दावा आहे. 2027 च्या अखेरीस युरोपमध्ये 3,000 फ्लॅश चार्जिंग स्टेशन उभारण्याचीही BYDची योजना आहे.
BYD Atto 8 दोन व्हेरिएंटमध्ये येणार आहे. Design RWD मध्ये मागील बाजूस एक इलेक्ट्रिक मोटर असून ती 456 hp पॉवर आणि 365 Nm टॉर्क देते. या व्हेरिएंटची WLTP रेंज 652 किमी आहे आणि 0 ते 100 किमी/तास वेग गाठण्यासाठी सुमारे 8 सेकंद लागतात. Excellence AWD मध्ये 2 इलेक्ट्रिक मोटर्स मिळतात. ही कार 764 hp पॉवर आणि 775 Nm टॉर्क निर्माण करते. ती अवघ्या 4.6 सेकंदांत 100 किमी/तास वेग गाठू शकते. या व्हेरिएंटची रेंज 602 किमी आहे.
डिझाइनच्या बाबतीत ही एसयूव्ही 5,040 मिमी लांब, 1,996 मिमी रुंद आणि 1,760 मिमी उंच आहे. केबिनमध्ये 15.6-इंच टचस्क्रीन, 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 26-इंच हेड-अप डिस्प्ले देण्यात आला आहे. Google Built-in, Google Assistant आणि वायरलेस फोन चार्जिंगसारख्या सुविधाही मिळतात. पॅनोरॅमिक ग्लास रूफ, 3-झोन क्लायमेट कंट्रोल आणि पुढील सीट्सना हीटिंग, व्हेंटिलेशन व मसाजची सुविधा देण्यात आली आहे.
7 सीट्स वापरताना बूट स्पेस 270 लिटर आहे. दुसरी आणि तिसरी रांग फोल्ड केल्यावर ही जागा 1,960 लिटरपर्यंत वाढते. बोनेटखाली 136 लिटरचा अतिरिक्त स्टोरेज कप्पाही आहे. सध्या युरोपसाठी या एसयूव्हीची घोषणा झाली असून, भारतातील लाँचबाबत कंपनीने माहिती दिलेली नाही. त्यामुळे भारतीय ग्राहकांना ही कार कधी मिळणार, याकडे डोळे लागले आहे.