इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या इलेक्ट्रीक वाहनांमुळे पर्यावरणपूरक आणि किफायतशीर वाहने उपलब्ध झाली आहेत. भारतामध्ये ही इलेक्ट्रीक वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये झालेली वाढ ही लक्षणीय आहे. सरकारकडूनही इलेक्ट्रीक वाहनांसाठी विशेष प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र या इलेक्ट्रीक वाहनांबद्दल काही समज आहेत. जसे की इव्ही मध्ये एअर कंडिशनर चा वापर केल्यास त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम हा बॅटरीवर होतो आणि त्यामुळे कारची बॅटरी कमी होते. हे तपासण्यासाठी ऑटोमोबाईल क्षेत्रातील एका नामांकित संकेतस्थळाने एसी 30 मिनिटे चालवून Tata Curvv EV आणि Tata Nexon EV वर AC बॅटरी ड्रेन चाचणी केली आहे. जाणून घेऊया या चाचणीबद्दल
या चाचणीकरिता Tata Curvv EV (55 kWh बॅटरी पॅक) आणि Tata Nexon EV (40.5 kWh बॅटरी पॅक) च्या लॉंग-रेंज प्रकारांची निवड केली गेली. या चाचणीला सुरुवात करण्याअगोदर, Curvv EV कारमध्ये 61 टक्के बॅटरी शिल्लक होती, तर Nexon EV मध्ये 75 टक्के बॅटरी शिल्लक होती. या दोन्ही कारमध्ये एसीचे तापमान 24 अंशावर सेट केले गेले आणि फॅनचा वेग 2 वर सेट केला गेला आणि या कारमध्ये 30 मिनिटांसाठी आत बसण्यात आले.
चाचणीचा परिणाम काय ?
या दोन्ही कार्समध्ये 30 मिनिटे एसी चालवल्यानंतर असे निदर्शनास आले की, दोन्ही EV च्या बॅटरीची टक्केवारी फक्त 1 टक्क्यांनी कमी झाली आहे. म्हणजे Curvv EV च्या बॅटरीची टक्केवारी ही 61 टक्क्यांवरून 60 टक्क्यांवर आली, तर Nexon EV ची बॅटरी ही 75 टक्क्यावरुन खाली आली येत ती 74 टक्क्यांवर आली.
कारच्या रेंजवर काय परिणाम झाला ?
या चाचणीनंतर, दोन्ही ईव्हीच्या बॅटरी रेंजमध्ये थोडीशी घसरण झाली. Nexon EV च्या रेंजमध्ये 3 किलोमीटर आणि Curvv EV च्या रेंजमध्ये 4 किलोमीटरची घट झाली.
या चाचणीमधून हे सिध्द झाले की एसीच्या वापरामुळे इलेक्ट्रीक वाहनातील बॅटरीमध्ये मोठ्या प्रमाणात घट होत नाही. कारच्या रेंजवरही अतिशय कमी परिणाम होतो. त्यामुळे आता इलेक्ट्रीक वाहन चालवताना बॅटरी आणि रेंजचा विचार न करता निर्धास्त होऊन एसी चालवू शकता आणि आरामदायी प्रवास करु शकता.