फोटो सौजन्य - Social Media
गेल्या काही वर्षांत भारतातील शहरी जीवनशैलीत मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत. धावपळीचे आयुष्य, वाढलेला कामाचा ताण, वाढते प्रदूषण, विस्कळीत दिनचर्या आणि अयोग्य खाण्याच्या सवयी यांचा थेट परिणाम शहरातील लोकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. याच कारणांमुळे काही विशिष्ट आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, त्यामध्ये थायरॉईड विकार आणि हिमोग्लोबिनची कमतरता या समस्या विशेष चिंतेचा विषय ठरत आहेत.
थायरॉईड ही मानेत असलेली लहान पण अत्यंत महत्त्वाची ग्रंथी आहे. शरीरातील चयापचय प्रक्रिया, ऊर्जा पातळी, वजन नियंत्रण आणि हार्मोन्सचे संतुलन राखण्याचे महत्त्वाचे काम ही ग्रंथी करते. तिच्या कार्यात बिघाड झाल्यास हायपोथायरॉईड किंवा हायपरथायरॉईडसारखे विकार निर्माण होतात. पूर्वी हे विकार प्रामुख्याने महिलांमध्ये आढळत होते; मात्र सध्याच्या बदललेल्या शहरी जीवनशैलीमुळे पुरुष आणि तरुणांमध्येही थायरॉईडच्या तक्रारी वाढताना दिसत आहेत. सततचा ताण, अपुरी झोप, अनियमित जेवण आणि कामाचे वाढलेले तास यामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडते आणि थायरॉईडच्या समस्या उद्भवतात.
त्याचबरोबर, हिमोग्लोबिनची कमतरता हीदेखील शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळणारी समस्या बनली आहे. हिमोग्लोबिन हे रक्तातील महत्त्वाचे घटक असून, शरीरातील विविध अवयवांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम ते करते. हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्यास थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे, धाप लागणे आणि कामात लक्ष न लागणे अशी लक्षणे दिसून येतात. शहरांमध्ये वाढलेल्या फास्ट फूड संस्कृतीमुळे शरीराला आवश्यक असलेले लोह, जीवनसत्त्वे आणि खनिजे पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत, ज्याचा थेट परिणाम हिमोग्लोबिनवर होतो. विशेषतः महिलांमध्ये मासिक पाळीमुळे होणारा रक्तस्राव आणि अपुरा आहार यामुळे ही समस्या अधिक गंभीर बनते.
शहरी जीवनशैलीतील काही ठळक घटक या दोन्ही आजारांना कारणीभूत ठरत आहेत. पोषक घरगुती आहाराऐवजी जंक फूडवर वाढलेले अवलंबन, बैठ्या स्वरूपाचे काम आणि व्यायामाचा अभाव, सततचा मानसिक तणाव तसेच वाढते वायू प्रदूषण हे प्रमुख कारणे मानली जातात. याशिवाय, उशिरापर्यंत मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर, नाईट शिफ्ट आणि अनियमित झोप यामुळे शरीराची नैसर्गिक जैविक घडी विस्कळीत होते, ज्याचा परिणाम हार्मोन्सच्या कार्यावर आणि रक्तनिर्मिती प्रक्रियेवर होतो.
तज्ज्ञांच्या मते, या समस्यांपासून बचाव करण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे अत्यंत गरजेचे आहे. संतुलित व पौष्टिक आहार, नियमित व्यायाम, योग-ध्यानाद्वारे तणाव नियंत्रण, पुरेशी झोप आणि प्रदूषणापासून शक्य तितका बचाव केल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होते. आहारात हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, डाळी, अंडी, मांस यांसारख्या लोहयुक्त पदार्थांचा समावेश करावा. तसेच आयोडीनयुक्त मीठाचा वापर केल्यास थायरॉईडच्या समस्यांवर नियंत्रण मिळू शकते.
शहरी जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या थायरॉईड आणि हिमोग्लोबिनच्या समस्या वेळीच ओळखून त्यावर योग्य उपाय न केल्यास भविष्यात गंभीर आरोग्य गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यामुळे आरोग्यदायी सवयी अंगीकारणे आणि स्वतःच्या आरोग्याकडे वेळेत लक्ष देणे ही आजच्या काळाची गरज आहे.






