फोटो सौजन्य - Social Media
भारतीय बाजारातील प्रसिद्ध मोपेड लूना आता इलेक्ट्रिक अवतारात पुनरागमन करत आहे. काइनेटिक ग्रीनने ई-लूना नावाने हा नवा इलेक्ट्रिक टू-व्हीलर सादर केला आहे. मजबूत बांधणी, चांगली रेंज आणि परवडणारी किंमत यामुळे ई-लूना हळूहळू बाजारात लोकप्रिय होत आहे. हा इलेक्ट्रिक मोपेड केवळ व्यक्तिगत वापरासाठी (B2C) नाही, तर व्यवसायिक उद्देशांसाठी (B2B) देखील योग्य पर्याय आहे. ई-लूना क्लासिक लूना मॉडेलच्या डिझाइनवर आधारित आहे. बॉक्सी डिझाइन आणि साइड पॅनलमुळे हा मोपेड रेट्रो लुक देतो. बिल्ड क्वालिटीच्या बाबतीत काही फरक जाणवतो, जसे की प्लास्टिकच्या भागांची गुणवत्ता थोडी कमी वाटू शकते. मात्र, हा इलेक्ट्रिक मोपेड मजबूत असून तो चांगला भार वाहून नेऊ शकतो.
ई-लूनामध्ये डिजिटल डिस्प्ले आहे, जो स्पीडोमीटर, ओडोमीटर, बॅटरी लेव्हल आणि रेंजसंदर्भातील माहिती दाखवतो. यामध्ये यूएसबी चार्जिंग सॉकेटही मिळते, ज्यामुळे तुम्ही स्मार्टफोन चार्ज करू शकता. साइड स्टँड सेंसर, डीटॅचेबल रियर सीट आणि साडी गार्ड यासारख्या सोयी देखील दिल्या आहेत. याची पेलोड क्षमता 150 किलो आहे, त्यामुळे हा व्यावसायिक वापरासाठी चांगला पर्याय ठरतो.
ई-लूनामध्ये 1.7kWh क्षमतेची बॅटरी आहे, जी एका चार्जवर 90 किमी पर्यंतची रेंज देते. आमच्या चाचणीत हा मोपेड 70 किमी सहज गाठू शकला. याच्या 120 किमी रेंज असलेल्या वेरिएंट्सही बाजारात उपलब्ध आहेत. यात 1.2kW क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर असून टॉप स्पीड 50 किमी प्रतितास आहे.
ई-लूना चालवायला हलकी आणि सोपी आहे. टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन आणि ड्युअल शॉक रियर सस्पेन्शनमुळे गाडी आरामदायक वाटते. यात ड्रम ब्रेक्स असून त्याचा प्रतिसाद वेगाच्या तुलनेत थोडा कमी वाटतो. तसेच, कंबाइंड ब्रेकिंग सिस्टम (CBS) सुरक्षित प्रवासासाठी दिले आहे. ई-लूना 70,000 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध आहे. रेड, येलो, ब्लू, ग्रीन आणि ब्लॅक अशा विविध रंगांत हा मोपेड बाजारात आला आहे. इलेक्ट्रिक स्कूटरच्या तुलनेत किंमत कमी असून, रोजच्या वापरासाठी हा योग्य पर्याय आहे. स्मार्ट फीचर्स किंवा जास्त रेंज हवी असेल तर इतर पर्याय विचारात घ्यावेत. पण कमी खर्चात उत्तम इलेक्ट्रिक वाहन हवे असेल, तर ई-लूना सर्वोत्तम निवड ठरू शकते.