प्रवासासाठी अनेकजण बसची निवड करतात. आरामदायी प्रवासासाठी अनेकांची पहिली पसंद बस प्रवासाला असते. ऑनलाईन सुविधांचा वापर करुन आपण बससेवा बुक करतो. अॅपच्या माध्यमातून आपल्याला त्या बसचं नाव, रेटिंग आणि त्या बसमध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत यांची माहिती मिळवतो. पण, ती बस आपल्यासाठी कितपत सुरक्षित आहे याबाबत कोणतीही माहिती मिळत नाही. याच समस्येवर उपाय म्हणून पेटीएमने नवीन फीचर लॉंच केलं आहे. त्यामुळे बससेवा खास करुन महिलांचा बसप्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.
पेटीएम या कंपनीने बसप्रवासाची सुरक्षितता सांगणारे नवीन फीचर आणले आहे. पेटीएममधील तिकीट बुकिंग पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला हे फीचर दिसून येईल. याआधी प्रवास केलेल्या महिलांच्या अनुभवांची संपूर्ण नोंद येथे तुम्हाला पाहायला मिळेल. या अनुभवांच्या आधारे आता कोणतीही महिला स्वत:साठी योग्य बस बुक करू शकणार आहे. पेटीएम ॲपवर महिलांसाठी ही खास सुविधा देण्यात आली आहे. यामुळे महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल असा दावा कंपनीने केला आहे. तसेच, या बस सुविधेचा रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी वेगवेगळे फीचर्स देखील देण्यात आले आहेत. यामुळे महिलांचा प्रवास सुरक्षित होणार आहे.
पेटीएम कंपनीच्या दाव्यानुसार, या नवीन फिचरमुळे महिलांना खूप मदत होणार आहे. यातील रेटिंगच्या पर्यायात महिला आपला बसमधील अनुभवाच्या आधारे बसला रेटिंग देऊ शकतात. या फीचरमध्ये, महिलांनी सर्वात आधी निवडलेल्या बसेस हायलाईट केल्या जातील, जेणेकरून इतर महिलांना चांगल्या बस ऑप्शनची माहिती मिळू शकेल. ऑनलाईन बस ऑप्शनमध्ये महिलांच्या आवडी-निवडीवरही भर देण्यात आला आहे. महिला यूजर्सने केलेल्या बुकिंगच्या आधारे, हा पर्याय बहुतेक महिला कोणत्या बस सेवेला प्राधान्य देतात ते कळेल.